महत्वाच्या बातम्या

 पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त : ९० गुन्हेगारांना दोन दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बल्लारपूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून शांततेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तब्बल ९० गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे.

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर १० व ११ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत संबंधित व्यक्तींना बल्लारपूर शहराच्या हद्दीत प्रवेश करून वास्तव्यास राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) अंतर्गत ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच पूर्वी विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तसेच सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करू शकणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी संबंधित व्यक्तींना प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. हद्दपारीच्या कालावधीत संबंधित व्यक्ती बल्लारपूर शहरात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोळा सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी बल्लारपूर पोलिसांकडून शहरातील हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, प्रतिबंधात्मक कारवाईसोबतच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी सणादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.





  Print






Related Photos