महत्वाच्या बातम्या

 शिक्षकांच्या कार्याचा गौरव : नगर परिषद बल्लारपूरतर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शिक्षक दिनानिमित्त बल्लारपूर नगर परिषदेतर्फे रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृह येथे शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विविध पुरस्कार व सन्मान देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष देवेंद्र आर्या, शिक्षण सभापती प्रियंका भारत थुलकर, नियोजन सभापती पवन मेश्राम, महिला व बालकल्याण उपसभापती शिल्पा चुटे, नगरसेविका वैशाली हुमणे, अंकूबाई भुक्या, छाया मडावी, वैष्णवी जुमडे, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार तसेच शैक्षणिक गुणवत्ता सल्लागार नागेश नीत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत शिक्षकांचे समाज आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व विशद केले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी रितीका ज्ञानसिंग सिंग हिने सन २०२६च्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याबद्दल प्रशस्तीपत्र व नवोदय परीक्षेचे पुस्तक देऊन तिचा गौरव करण्यात आला. तसेच पीएम श्री गांधी विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय लाठी-काठी या पारंपरिक खेळात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके मिळवल्याबद्दल प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


नगर परिषद बल्लारपूरच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व नियमित तसेच कंत्राटी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सन २०२५-२०२६ या शैक्षणिक सत्रात ‘प्रोजेक्ट अरुणोदय’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास राईला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेचे शिक्षण सेवक बिनय बादल दत्ता तसेच कंत्राटी क्रीडा शिक्षक स्वप्नील गौतम डंभारे यांना ‘शिक्षकभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पवन मेश्राम व प्रियंका थुलकर यांनी मनोगतातून शिक्षकांना मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पवित्र पोर्टलमार्फत नवनियुक्त शिक्षण सेविका वृषाली यामावार यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई यांनी शिक्षक सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षकांना मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर डाखोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र गुडधे यांनी केले. उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर परिषद बल्लारपूरचे अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांनी सहकार्य केले.





  Print






Related Photos