बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शहरातील एका सभागृहात बंजारा समाजातील महिलांच्या पुढाकारातून पारंपरिक तीज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवाला वर्धा शहरासह लगतच्या परिसरातील महिला, तरुण, युवती तसेच बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोकवारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाच्या पारंपरिक जीवनपद्धतीत तीज उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या उत्सवाच्या माध्यमातून निसर्गातील विविध घटकांचे संवर्धन, जतन आणि पर्यावरणाबाबत जागृती करण्याचा संदेश दिला जातो.
महोत्सवादरम्यान महिला व पुरुषांनी एकत्र येत बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. पारंपरिक गीतांच्या माध्यमातून बंजारा समाजाची संस्कृती, रूढी-परंपरा आणि जीवनपद्धती तरुण पिढीला समजावून सांगण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. आधुनिकतेच्या काळात पारंपरिक लोककला व सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमात समाजातील शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी रवी भिया खोला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाला प्राधान्य देण्याबरोबरच आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या विचारातून स्पष्ट केले.
आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांचे परिश्रम -
तीज महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गोरसिक वाडी सामाजिक संघटना भारत यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याचे नायक रोहिदास राठोड, मधुकर जाधव, प्रकाश राठोड, मनोज राठोड, मनोहर चव्हाण, संतोष जाधव, हेमंत पवार, राम राठोड, वीणा चव्हाण, वनिता राठोड, लता जाधव आणि सुनीता राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजातील महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बंजारा समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा अधिक बळकट होण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




