महत्वाच्या बातम्या

 आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेल्या आपदा मित्र व सखींनी समाजामध्ये जनजागृती करावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


- आपदा मित्र प्रशिक्षणाचा समारोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : देशात, राज्यात किंवा जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये फक्त प्रशासनाचा सहभाग मर्यादित न ठेवता समाजातील घटकांचा सहभाग आवश्यक आहे. कुठल्याही आपत्ती किंवा संकटांना सामोरे जातांना कौशल्याचा पुरेपूर फायदा होतो. आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण घेतलेल्या आपदा मित्र व सखींचे काम आज खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. तसेच या प्रशिक्षणाचा लाभ इतरांना सुध्दा द्यावा व समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी केले.

प्रशिक्षणामुळे मनोबल व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे सांगून जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे म्हणाले, नियोजनबद्ध पध्दतीने प्रत्येक गावात आपदा मित्र तयार व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

रावणवाडी येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षणाच्या आपदा मित्र पहिल्या तुकडीच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, प्रशिक्षक किशोर सोनटक्के, संजयकुमार पटले यावेळी उपस्थित होते.

रावणवाडी येथे आयोजित निवासी पाच दिवसीय प्रशिक्षणातून पहिल्या तुकडीमधून ७८ आपदा मित्र तयार झालेले आहेत. यामध्ये २३ महिलांचा देखील सहभाग आहे. आपदा मित्र जिल्ह्यातील विविध गावांमधून असून त्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र व आपत्तीच्या काळात उपयोगी असणाऱ्या किटचे वितरण यावेळी करण्यात आले. या पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये अग्निशमन प्रात्याक्षिक, रोड सेफ्टीबाबत जनजागृती, बोट कशी चालवायची, विषबाधा झाल्यास काय करावे तसेच प्राथमिक उपचार, पूर, भूकंप इत्यादी आल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांना आपत्तीच्या काळामध्ये आपदा मित्र व सखी यांची मदत होणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos