नागभीडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर धाड : १.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत १ लाख १८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
१६ मे २०२६ रोजी नागभीड परिसरात अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या ब्रम्हपुरी पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हीरो डेस्टिनी मोपेड क्रं.MH ३४ CK ४०६२ जप्त केली.
या कारवाईत पवन देवचंद दुधे रा. कोथुळणा, ता. नागभीड व अक्षय गजानन तुपकर रा. मिंडाळा, ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले असून मालारेड्डी नरेडला रा. नागभीड हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त मुद्देमालामध्ये ३०० नग रॉकेट देशी दारू संत्रा ९० मि.ली.च्या बाटल्या, १२८ नग सखु संत्रा टॅगो प्रिमियम, ७४ नग देशी प्रिमियम, ७२ नग १८० मि.ली.च्या देशी दारूच्या बाटल्या, तसेच ऑफीसर चॉईस ब्लू, मॅकडॉवेल्स नं.१, बॅरल २४ आणि सहेंद्री गोल्ड या विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. यासोबतच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोपेडही पोलिसांनी जप्त केली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन नागभीड येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(अ), ८३ अन्वये अप.क्र. २३४/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या ब्रम्हपुरी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
News - Chandrapur




Petrol Price




