महत्वाच्या बातम्या

 सत्य-अहिंसेच्या वाटेवर चालण्याचा संदेश : महिला विद्यापीठात गांधी-शास्त्री जयंती भावपूर्ण वातावरणात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सत्य, अहिंसा, साधेपणा आणि राष्ट्रसेवेच्या महान विचारांनी देशाला दिशा देणाऱ्या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतींना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित गांधी-शास्त्री जयंती कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिर्माणासाठी दिलेले योगदान आठवताना परिसरात आदर आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे. महात्मा गांधी सत्य, अहिंसा आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांचा केवळ गौरव करण्यापेक्षा ते आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता, सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांसोबतच लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने देशाच्या विकासात जवान आणि शेतकऱ्यांचे स्थान अधोरेखित केले. या महान विचारांचा वारसा नव्या पिढीने जपावा, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकपणाची कास धरावी, तसेच राष्ट्रसेवेची भावना मनात रुजवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गांधीजींच्या अहिंसेची ताकद आणि शास्त्रीजींच्या साधेपणातील असामान्य नेतृत्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात त्यांची मूल्ये उतरावीत, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्यासह विद्यापीठातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.





  Print






Related Photos