बल्लारपूरच्या १ हजार घरकुलांसाठी आ. सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार


- प्रधानमंत्री आवास योजनेतून गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गरजू व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) नागपूर येथील कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
बल्लारपूर शहरातील घरकुलांची वाढती गरज लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर मिळावे, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. घरकुलाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बल्लारपूरमधील प्रस्तावित १ हजार घरकुलांच्या प्रकल्पासाठी उपलब्ध शक्यता, आवश्यक प्रक्रिया आणि प्रस्ताव सादरीकरणाबाबत अधिकाऱ्यांशी आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली. संबंधित यंत्रणांनी प्रस्तावाची कार्यवाही वेगाने पूर्ण करून तो पुढील मंजुरीसाठी सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील म्हाडाशी संबंधित इतर विषयांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. मात्र, बल्लारपूर येथील १ हजार घरकुलांचा प्रस्ताव पुढे नेण्यास प्राधान्य देण्यात आले. बल्लारपूर शहरातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक नियोजन आणि प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
घरकुल हा सर्वसामान्य कुटुंबांच्या सुरक्षितता आणि सन्मानाशी निगडित महत्त्वाचा प्रश्न असल्याने बल्लारपूरमधील प्रस्तावित प्रकल्पाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली. त्यामुळे बल्लारपूर शहरातील घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांच्या आशा या प्रस्तावामुळे उंचावल्या आहेत.




Petrol Price




