महत्वाच्या बातम्या

 पिलांसह वाघिणीचा रस्त्यावर ठिय्या : बांबर्डा परिसरात खळबळ


- तीन पिलांसह तासभर वाघिणीचा वावर; शेतकरी धास्तावले, पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बांबर्डा ते चामला मार्गावर शनिवारी दुपारी तीन पिलांसह वाघिणीने तब्बल तासभर ठिय्या दिल्याची घटना घडली. रस्त्यावर वाघीण बसलेली पाहून शेतकरी व वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, वाघिणीचा हा थरारक वावर एका कारचालकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शनिवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मारुती घटी यांच्या शेताजवळ बांबर्डा ते चामला मार्गावर एका कारचालकाला वाघीण आणि तिची तीन पिले दिसली. वाघीण रस्त्यावर बसलेली होती, तर तिची पिले रस्त्याच्या कडेला तसेच शेतशिवारात फिरत असल्याचे दिसून आले. अचानक समोर वाघीण आणि पिले दिसल्याने कारचालक चाफले यांनी काही अंतरावर थांबून हा संपूर्ण प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात टिपला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
वाघिणीचा तीन पिलांसह रस्त्यावर वावरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच बांबर्डा परिसरात एकच खळबळ उडाली. वाघीण आणि तिची पिले पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मात्र, नागरिकांची ही गर्दी वन्यजीव तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

विशेषतः पिलांसह असलेली वाघीण अधिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तिच्या जवळ जाणे, हुल्लडबाजी करणे किंवा तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणे टाळणे गरजेचे आहे. वन्यप्राण्याला डिवचल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून वाघ, अस्वलाच्या वावराची चर्चा -
बांबर्डा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ तसेच अस्वलाचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. आता प्रत्यक्ष तीन पिलांसह वाघिणीचे दर्शन झाल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. दिवसा वाघिणीचा शेतशिवार व रस्त्याच्या परिसरात वावर आढळून आल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी शेतकरी अंबादास चंदीवाले यांच्या मालकीच्या गायीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. त्यातच आता पिलांसह वाघिणीचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी -
वाघिणीच्या दर्शनाची माहिती बांबर्डा येथील पोलिस पाटलांनी तातडीने तळेगाव वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी जी. बी. लांबाडे यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाकडून वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतशिवारात जाताना विशेष काळजी घ्यावी, एकट्याने शेतात जाणे टाळावे, तसेच वन्यप्राणी आढळून आल्यास त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्याचा पाठलाग करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

चार गावांमध्ये भीतीचे वातावरण -
वाघीण तीन पिलांसह थार, चामला, बांबर्डा आणि बोरखेडी या गावांच्या परिसरात वावरत असल्याची माहिती आहे. या भागात जंगलालगतची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचा वन्यप्राण्यांशी वारंवार सामना होण्याची शक्यता आहे. पोट भरण्यासाठी वन्यप्राण्यांकडून पशुधनावर हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने चारही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघिणीचा दिवसा रस्त्यावर आणि शेतशिवारात वावर दिसून आल्याने शेतकरी शेतात जाण्यासही धास्तावत आहेत. खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असताना वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन -
पिलांसह वाघिणीचा वावर असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. वाघिणीला पाहण्यासाठी गर्दी करणे, वाहनातून उतरून तिच्याजवळ जाणे, आरडाओरड करणे किंवा फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी तिचा पाठलाग करणे टाळावे. अशा प्रकारच्या गर्दीमुळे वाघीण चिडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, वाघिणीच्या हालचालींवर वन विभागाने सातत्याने लक्ष ठेवून तिचा मानवी वस्तीत प्रवेश होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि पशुधनावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वन विभागाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.





  Print






Related Photos