CEIR पोर्टलच्या मदतीने मूल पोलिसांनी शोधले २२ हरवलेले मोबाईल


- सायबर सेलच्या तांत्रिक तपासातून सहा मोबाईल हस्तगत; संबंधित तक्रारदारांना केले परत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी हरवलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यासाठी पोलिसांनी Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर केला. CEIR पोर्टल आणि सायबर सेल, चंद्रपूर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तांत्रिक तपासातून नुकतेच सहा हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व मोबाईल संबंधित सहा तक्रारदारांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करण्यात आले.सन २०२६ मध्ये आतापर्यंत मूल पोलिसांनी एकूण २२ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढून ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.
मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोबाईल हरवल्याबाबत दिलेल्या तक्रारी व नोंदींच्या आधारे संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR पोर्टलवर नोंदविण्यात आले. त्यानंतर तांत्रिक पद्धतीने या मोबाईलवर लक्ष ठेवण्यात आले. हरवलेल्या मोबाईलमध्ये नवीन सिमकार्ड वापरण्यात आल्यानंतर CEIR प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करून मोबाईल हस्तगत केले. त्यानंतर मोबाईलची पडताळणी करून ते संबंधित तक्रारदारांचेच असल्याची खात्री करण्यात आली.कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील सपोनि. सुरेश कन्नाके, पोहवा. नरेश कोडापे, पोअं. दिलीप आदे, नरेंद्र वाकडे, प्रकाश विक्रम, शंकर बोरसरे तसेच सायबर सेल, चंद्रपूरच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
हरवलेले मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून ते नागरिकांना परत करण्याची ही कारवाई नागरिकाभिमुख पोलिसिंगचे उदाहरण ठरत असून, त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.




Petrol Price




