महत्वाच्या बातम्या

 नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पार्वती राजेंद्र गुप्ता ३० वर्ष रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर, असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती गुप्ता या गेल्या काही महिन्यांपासून नियमित वैद्यकीय तपासणी व उपचार घेत होत्या. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना रक्त चढविण्यात येत होते. रक्त चढवित असताना पार्वती यांना अचानक थंडी वाजत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने शहरातील दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पार्वती गुप्ता यांना मृत घोषित केले.महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक संतप्त झाले. उपचारादरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यामुळेच पार्वती यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून या प्रकरणाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेडिकल बोर्ड कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवाल तसेच वैद्यकीय समितीच्या चौकशी अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.आज दुपारपर्यंत नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी करीत मृतदेहाचे शवविच्छेदन करून घेण्यास आक्षेप घेतला होता. तसेच संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी नातेवाईक रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते.

रक्त चढविताना आलेली थंडी, त्यानंतर बिघडलेली प्रकृती आणि झालेला मृत्यू यांचा परस्पर संबंध होता का, यासह उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की अन्य काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली, याचा उलगडा शवविच्छेदन व मेडिकल बोर्डाच्या अहवालानंतरच होणार आहे. रामनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.





  Print






Related Photos