महत्वाच्या बातम्या

 पोक्सो, बालविवाहासह बालहक्कांवर सुबई चा शिवाजी आश्रमशाळेत जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील सुबई येथील शिवाजी आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या उपस्थितीत बालसुरक्षा व बालहक्कांबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, बालविवाह, बालभिक्षेकरी, बालगुन्हेगारी आणि बालकामगार यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन आदी यंत्रणांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालकांच्या संदर्भात यंत्रणांकडे आलेल्या विविध प्रकरणांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी संकटाच्या प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, तसेच मदतीसाठी संबंधित यंत्रणांशी कसा संपर्क साधावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी राणी खडसे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. केंद्रामार्फत हाताळण्यात आलेल्या विविध प्रकरणांची उदाहरणे सांगून मुलींना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा संकट उद्भवल्यास घाबरून न जाता योग्य व्यक्ती अथवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी, असे त्यांनी सांगितले.

प्रतिभा मडावी यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कार्याची माहिती दिली. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळासमोर कोणत्या प्रकारच्या बालकांना उपस्थित केले जाते, याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

बालगृह व निरीक्षणगृहात कोणत्या परिस्थितीतील बालकांना ठेवले जाते, याची माहिती देतानाच बालगुन्हेगारी आणि बालकामगार या गंभीर समस्यांवरही विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. बालकांचे हक्क, सुरक्षितता आणि संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय यंत्रणांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  झाडे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी योग्य यंत्रणेकडून मदत घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.





  Print






Related Photos