महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू : आरोग्य यंत्रणा नेमकी करतेय काय?


- माता-बाल मृत्यूंची मालिका सुरू असताना जिल्हा शल्य चिकित्सकांची जबाबदारी कोण घेणार - आजाद समाज पक्षाचा संतप्त सवाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके या महिलेचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्यातील जिजा हंसराज सातर आणि २२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कोजबी येथील नाजुका दिवाकर राऊत यांचा गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या घटनांची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच पुन्हा माता-बाल मृत्यूची घटना घडणे हे अत्यंत गंभीर आहे.

एकाच रुग्णालयात वारंवार अशा घटना घडत असतील, तर त्या केवळ दुर्दैवी घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत. रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, मनुष्यबळ, उपचारपद्धती, वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

मागील माता-बाल मृत्यू प्रकरणात जर दोषींवर कठोर आणि जबाबदारी निश्चित करणारी कारवाई झाली असती, तर कदाचित त्यानंतरची यंत्रणा अधिक सतर्क झाली असती. मात्र कारवाईचा धाकच निर्माण झाला नसेल, तर प्रशासनाकडून निष्काळजीपणा सुरूच राहणार नाही का, असा सवाल आजाद समाज पक्षाने उपस्थित केला आहे.

विशेष मागास जिल्ह्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च मग रुग्णांचे जीव सुरक्षित का नाहीत -
गडचिरोली हा विशेष मागास व आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील आरोग्य सुविधांसाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाचा पैसा खर्च होत असताना सामान्य गरीब, आदिवासी आणि ग्रामीण जनतेला सुरक्षित व दर्जेदार उपचार मिळत नसतील, तर या खर्चाचा नेमका उपयोग कोणासाठी?

जिल्हा शल्य चिकित्सकांची तातडीने जबाबदारी निश्चित करा -
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, प्रत्येक माता-बाल मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या संपूर्ण व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी आजाद समाज पक्षाने केली आहे.

वारंवार घटना घडत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांचा अधिकाऱ्यांवर आणि रुग्णालय प्रशासनावर नेमका किती धाक उरला आहे? याचे उत्तर प्रशासनाने जनतेला द्यावे.

आता केवळ चौकशी नको, ठोस कारवाई हवी -
आजाद समाज पक्षाच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की, माता-बाल मृत्यूच्या या प्रकरणात तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर आजाद समाज पक्ष रुग्णालय प्रशासनाच्या दरवाज्यातच आंदोलन छेडेल.





  Print






Related Photos