मुरुमबोडीत अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई


- दोन ठिकाणी छापे; १ लाख ५८ हजार ९०० रुपयांचा दारूसाठा व साहित्य जप्त, चौघांवर गुन्हे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. तालुक्यातील मुरुमबोडी परिसरात ४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख ५८ हजार ९०० रुपये किमतीचा दारूसाठा आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. या कारवाईत हातभट्टी दारू, मोहाफूल आणि विदेशी दारूचा समावेश आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिघे आरोपी फरार आहेत.
घर व शेतातून १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त -
पोलिसांनी केलेल्या पहिल्या कारवाईत हिरासिंग बाजीराव उसेंडी ५० वर्षे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची तसेच शेत परिसराची झडती घेतली असता १ लाख १७ हजार रुपये किमतीची हातभट्टी दारू, मोहाफूल आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या अवैध दारू निर्मितीच्या व्यवसायात उसेंडीला मदत करणारे प्रेम मडावी आणि नरेश गावडे हे दोघे पोलिसांच्या कारवाईपूर्वीच फरार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दुसऱ्या छाप्यात विदेशी दारू जप्त -
यानंतर पोलिसांनी रवींद्र आवारे याच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान त्याच्या घरातून ४१ हजार ९०० रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच रवींद्र आवारे घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
सणांच्या काळात अवैध दारूविक्रीवर लक्ष -
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर परिसरात अवैध दारूची निर्मिती व विक्री होऊ नये, यासाठी पोलिसांनी कारवाई वाढविली आहे. मुरुमबोडी परिसरात करण्यात आलेल्या या दोन कारवायांमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ५८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.




Petrol Price




