डोंगरहळदीत अवैध दारूविक्रीवर उमरी पोलिसांचा छापा १२ हजारांचा देशी दारूसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : उमरी पोतदार पोलिसांनी बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत डोंगरहळदी येथे छापा टाकून १२ हजार रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २९ जून रोजी मौजा डोंगरहळदी येथील अविनाश गजानन लेनगुरे (वय ३२) यांच्या राहत्या घरावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान घराच्या अंगणात व बाथरूमजवळ ठेवण्यात आलेल्या तीन पुठ्ठ्याच्या खोक्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीत खोक्यांमध्ये प्रत्येकी ९० मिली क्षमतेच्या ‘रॉकेट संत्रा’ ब्रँडच्या एकूण ३०० सीलबंद देशी दारूच्या बाटल्या अवैधरित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण दारूसाठा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध उमरी पोतदार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६८/२०२६ नोंदविण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले मार्गदर्शनाखाली उमरी पोतदार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनोने, सफौ नरेंद्र खोब्रागडे, पोलीस अंमलदार कुणाल सातपुते आणि प्रवीण आसुटकर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




