महत्वाच्या बातम्या

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील दोनशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील २०४ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

आज भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत (७२ कोटी) उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारासाठी (१४.९४ कोटी), विश्रामगृहाचे विस्तारीकरण (८.४३ कोटी), स्त्री रुग्णालयाच्या टप्पा दोनचे बांधकाम (२५ कोटी), उपजिल्हा रुग्णालय पवनी (३८.९९ कोटी), अनुसूचित जातीचे शासकीय निवास शाळा कोंढा येथील बांधकाम (३४ कोटी) तर पवनी विश्रामगृहाचे विस्तारीकरण (२.४७ कोटी) या विकास कामांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी मध्यवर्ती ठिकाणी असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत  चांगल्या दर्जाचे व्हावी व त्याद्वारे नागरिकांना उत्तम शासकीय सेवा मिळाव्यात अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

या शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला. पारदर्शक प्रणालीनुसार पुढील वर्षी ई -पिक मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी यावर्षी ई -पिक मध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना देखील शासनातर्फे सूट देऊन बोनस देण्यात आलेला आहे. धानाचा बोनस  पात्र शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेद्वारे ११ महिन्यात ९ हजार  मेगावॉटचे करार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याद्वारे  मागेल त्याला सौर पंप योजना सुरू करण्यात आली असून त्याद्वारे आतापर्यंत आठ लाख सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत.

लोकाभिमुख शासनाच्या योजना राबवत असताना अधिकारी , कर्मचाऱ्यांची कार्यालय देखील चांगली झाली पाहिजेत. त्या कार्यालयामधून  नागरिकांना देखील वेळेत आणि दर्जेदार शासकीय सुविधा दिल्या गेल्या पाहिजे अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

भंडारा जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी यावेळी सांगितले तर भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळण्यासाठी अधिक निधी प्राप्त व्हावा अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संचलन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदार यांनी तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे केले.





  Print






News - Bhandara




Related Photos