महत्वाच्या बातम्या

 सर्पदंशात मृत्यू झालेल्या दीपिका लकडा यांच्या कुटुंबाला आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची एक लाख रुपयांची आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या जव्हेली येथील विद्यार्थिनी दीपिका एतवा लकडा (वय १२) हिच्या कुटुंबीयांना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

दीपिका लकडा ही एटापल्ली तालुक्यातील जव्हेली येथील रहिवासी असून, ती धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. दरम्यान, १० ऑगस्टच्या मध्यरात्री वसतिगृहात झोपलेली असताना सापाने दंश केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे लकडा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

या पार्श्वभूमीवर मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी एटापल्ली दौऱ्यावर असताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबाला एक लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केली. तसेच, या दुःखाच्या प्रसंगी आपण आणि आपले कुटुंबीय त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू, अशी ग्वाही देत कुटुंबीयांना धीर दिला.

दरम्यान, दीपिकाच्या अंत्यसंस्कारासाठीही आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सल्ल्यानुसार डॉ. मिताली आत्राम यांनी यापूर्वी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे संकटाच्या काळात लकडा कुटुंबाला आत्राम कुटुंबीयांकडून मदतीचा हात मिळाला आहे.

दीपिकाच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





  Print






Related Photos