महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात उद्या चंद्रपुरात भव्य धरणे आंदोलन


- संघर्ष समितीची पत्रकार परिषदेत घोषणा; सामाजिक न्याय व संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचालींविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून, अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सोमवार, १८ मे २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य जिल्हास्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती देताना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून संविधानिक मूल्यांना धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३४१ अंतर्गत अनुसूचित जातींना मिळालेले घटनात्मक संरक्षण अबाधित ठेवणे आवश्यक असून, सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

यावेळी न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल असंवैधानिक व अन्यायकारक असल्याचा आरोप करत समिती बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आर्थिक व शैक्षणिक योजना राबविण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे.

हे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार असून, अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटकांनी सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे निमंत्रक अशोक टेंभरे, किशोर तेलतुंबडे, अनंत बाबरे, राजकुमार जवादे आणि प्रा. नितीन रामटेके यांनी केले.

पत्रकार परिषदेला प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, बंडू ठेंगरे, अशोक फुलझेले, धर्मेश निकोसे, सुरेश नारनवरे, सुरेंद्र रायपुरे, जितेंद्र डोहाणे, प्रतीका होलीकर, अँड. राजस खोब्रागडे, तनुजा रायपुरे, प्रेरणा करमरकर, गीता रामटेके, निर्मला नगराळे, हर्षल खोब्रागडे, युगाण दवले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, या आंदोलनात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्ष खोरीपा, वंचित बहुजन आघाडी, बीएसपी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बीआरएसपी, भीम आर्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट मेडिकोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन इंडिया, भीम शक्ती संघटना, भारतीय सुदर्शन समाज महासंघ, विविध सामाजिक संघटना, बौद्ध विहार मंडळे, खाटीक समाज संघटना, राष्ट्रीय चर्मकार संघ, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कृती समिती आदी संघटनांचा सहभाग राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos