महत्वाच्या बातम्या

 दारूसाठी पैसे न दिल्याचा राग : मुलाने वडिलांच्या अंगावर टाकले गरम भाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून एका मुलाने स्वतःच्या वडिलांच्या अंगावर गरम भाजी टाकून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरातील विवेकानंद वॉर्ड परिसरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुर्यप्रकाश मलयया मेगनवार (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा काशीविश्वनाथ सुर्यप्रकाश मेगनवार (वय २४) याला दारूचे व्यसन असून तो कोणताही रोजगार करत नाही. दारूच्या नशेत तो वारंवार घरात वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१२ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास काशीविश्वनाथ याने वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने तो संतापून घरातून निघून गेला. त्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजता तो दारूच्या नशेत घरी परतला आणि घरात शिवीगाळ करू लागला. सुर्यप्रकाश मेगनवार हे खाटेवर बसून मोबाईल पाहत असताना आरोपीने मागून येत गरम भाजी त्यांच्या डोक्यावर व उजव्या कानामागील भागावर ओतली.

अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांना भाजल्याने दुखापत झाली. त्यांनी तातडीने बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याने उपचार केले असता कानामागील भाग भाजून जखमी झाल्याचे आढळून आले. यानंतर आरोपीने आई-वडिलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला.

घटनेनंतर सुर्यप्रकाश मेगनवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी काशीविश्वनाथ मेगनवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश वाघमारे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos