महत्वाच्या बातम्या

 जम्मू-काश्मीर : ऑपरेशन त्राशी-१ मध्ये जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर आदिल ठार


- दहशतवादी आदिलचा खात्मा, सुरक्षा दलांचा शहीद जवानाच्या हल्ल्याचा सूड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन त्राशी-१ अंतर्गत जैश-ए-मोहम्मदच्या एका वरिष्ठ कमांडरला ठार केले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आदिल असून, तो पाकिस्तानचा नागरिक होता. आदिल हा जैशचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सैफुल्ला उर्फ स्वारुद्दीन याचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता.

ऑपरेशन त्राशी-१ : गुप्त माहितीवर आधारित चकमक -
सुरक्षा दलांना किश्तवाडच्या डिछार आणि चत्रू भागात दहशतवाद्यांच्या लपण्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीआयएफ डेल्टा, व्हाइट नाईट कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी संयुक्त मोहिम सुरू केली. बुधवारी सायंकाळी ५:४५ वाजता दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली, ज्यामध्ये आदिल ठार झाला. आदिलवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांमध्ये सामील होता.

हाय अलर्ट, शोध सुरू -
ऑपरेशन त्राशी-१ अंतर्गत अद्याप घनदाट जंगलात आणि दुर्गम भागात इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. किश्तवाडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून चत्रूच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कडेकोट नाकेबंदी करण्यात आली आहे.

उधमपुरमध्ये देखील कारवाई -
किश्तवाडमधील चकमकीच्या काही तास आधी उधमपुरमधील बसंतगड भागात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह दुसऱ्या दहशतवाद्याला मारले. भारतीय लष्कराने पीर पंजाल डोंगररांगा दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांना खदेडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.

पाकिस्तानी ड्रोनचा कट उधळला -
जम्मू सेक्टरमधील एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचालींविषयी बातम्या समोर येत आहेत. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना शस्त्रे आणि अमली पदार्थ पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. भारतीय लष्कराने हा कट उधळून लावण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे.

शहीद जवानाच्या हल्ल्याचा बदला -
गेल्या १८ जानेवारीला सोन नार परिसरात जैशच्या दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. आदिलच्या खात्म्यामुळे सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा बदला घेतल्याचे मानले जात आहे.





  Print






News - World




Related Photos