महत्वाच्या बातम्या

 सिंड्राई रेतीघाट दुर्घटना : मृत मजुराच्या कुटुंबाची भेट घेत प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका


- दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; पीडित कुटुंबाला ₹५० लाखांची मदत व पत्नीला शासकीय नोकरीची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
 सिंड्राई रेतीघाटावर रेती उत्खननादरम्यान जेसीबी यंत्राखाली दबून मृत्यू झालेल्या मजूर विलास देवढवले यांच्या जुनी वडसा येथील निवासस्थानी आज आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) संयुक्त शिष्टमंडळाने भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, विवेक खोब्रागडे, ऋषी सहारे, मंगेश बन्सोड, शुभम पाटील आणि प्रतीक डांगे उपस्थित होते.

शिष्टमंडळाने मृताच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कुटुंबीयांनी शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आर्थिक किंवा प्रशासकीय मदत मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी बोलताना राज बन्सोड आणि कॉ. अमोल मारकवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

एवढी गंभीर घटना घडून अनेक दिवस उलटूनही एकाही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीने पीडित कुटुंबाची साधी भेट घेण्याचेही सौजन्य दाखविले नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी पीडित कुटुंबाबाबत असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली.

त्यांनी सांगितले की, विलास देवढवले हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ ₹५० लाखांची आर्थिक मदत जाहीर करून मृताच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी, वडसा कार्यालयाकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक ०३८१/२०२६ चा अभ्यास केल्यानंतर गंभीर बाब समोर आल्याचा दावा शिष्टमंडळाने केला. या गुन्ह्यात केवळ जेसीबी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १३४ आणि १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या रेती कंत्राटदार, संबंधित कंपनी, उपविभागीय अधिकारी (एसडीएम), तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.

राज बन्सोड आणि कॉ. अमोल मारकवार यांनी आरोप केला की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध रेती उत्खनन खुलेआम सुरू असून ते वरिष्ठ अधिकारी आणि प्रभावशाली राजकीय घटकांच्या संगनमताशिवाय शक्य नाही. सिंड्राई येथील दुर्घटना ही केवळ वाहन अपघात नसून महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर रेती उत्खननाचा थेट परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे केवळ चालकावर गुन्हा दाखल करून प्रत्यक्ष जबाबदारांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याशिवाय काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांकडून हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करावी, तसेच रेती कंत्राटदार, संबंधित कंपनी, एसडीएम, तहसीलदार आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधासह लागू होणारे सर्व फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.

प्रमुख मागण्या -
- मृत विलास देवढवले यांच्या कुटुंबाला तात्काळ ₹५० लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी.
- मृताच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी.
- रेती कंत्राटदार, संबंधित कंपनी, एसडीएम, तहसीलदार व इतर जबाबदारांवर मनुष्यवधासह लागू होणारे सर्व गुन्हे दाखल करावेत.
- संपूर्ण प्रकरणाची एसआयटी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी.
- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाला संरक्षण देणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल. आवश्यक असल्यास न्यायालयीन लढाही उभारण्यात येईल, असा इशारा राज बन्सोड आणि कॉ. अमोल मारकवार यांनी दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos