बल्लारपुरात सट्टापट्टीवर पोलिसांचा धडक अभियान : दोन कारवायांत आरोपींसह मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात सुरू असलेल्या अवैध सट्टापट्टी जुगाराविरोधात बल्लारपूर पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सट्टापट्टी जुगार चालविणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोबाईल, सट्टापट्टी साहित्य व रोख रक्कम असा एकूण २१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार साईबाबा वॉर्ड परिसरातील एका कोल्ड्रिंक दुकानात सट्टापट्टी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता सतवंतसिंग राजेंद्रसिंग दिगवा (वय ३२), रा. शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर हा लोकांकडून पैसे घेऊन मिलन डे, कल्याण, टाईम बाजार, श्रीदेवी, राजधानी व मेन बाजार या मटका गेमवर हारजितचा जुगार खेळविताना आढळून आला.
आरोपीकडून विवो कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल, व्हॉट्सअॅपवरील सट्टापट्टी व्यवहारांचे स्क्रीनशॉट तसेच रोख रक्कम असा एकूण २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान डेड भगवान नावाने सुरू असलेल्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरून सट्ट्याचे आकडे पाठविले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणात संतोष नथ्थुजी भोयर व सिकंदर अली उर्फ ईराणी लल्ला यांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड परिसरात श्रीदेवी डे व टाईम बाजार सट्ट्यावर पैसे घेऊन जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपीस रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सट्टापट्टीचे आकडे लिहिलेला कागद, बॉलपेन व रोख रक्कम असा एकूण १ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवाया बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने केल्या. दोन्ही प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




