महत्वाच्या बातम्या

 भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ३ जून रोजी प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन : अरविंद कात्रटवार यांचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, सेवेतून निलंबित करावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागण्यांसाठी बुधवार, ३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लाझेंडा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ च्या कार्यालयासमोर ‘प्रतिकात्मक प्रेतयात्रा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली आहे.

अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कात्रटवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून, संबंधित प्रकरणांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कात्रटवार यांनी सांगितले की, यापूर्वीही अभियंता साखरवाडे यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात विविध स्तरांवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच २५ मे २०२६ रोजी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर डफरे बजाओ आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने आता प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांनुसार, कोरची तालुक्यातील नाडेकल–बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ग्रामीण भागातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनेक कामे प्रत्यक्षात न करता त्यांची बिले काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, मागील तीन वर्षांत हजारो निविदा नियमबाह्य पद्धतीने काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

कार्यालयीन कामकाजासंदर्भातही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिला कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करत या प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नाडेकल येथील कोसळलेल्या पुलाच्या प्रकरणाची त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून संबंधितांकडून शासकीय निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही कात्रटवार यांनी केली आहे.

कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्याविरोधात योग्य ती कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे. या आंदोलनाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे तसेच संबंधित विभागाचे लक्ष लागले असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos