महत्वाच्या बातम्या

 पक्षांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


- चंद्रपुरात राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : या पृथ्वीतलावर मनुष्य हा सर्वात ज्युनिअर प्राणी आहे. मानव जातीच्या कितीतरी आधीपासून येथे वन्यप्राणी व पुशपक्षांचे अस्तित्व असून अन्नसाखळीचे ते प्रमुख घटक आहेत. ही प्रजाती नष्ट झाली तर पर्यावरण संतुलन व मानवी जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पक्षांच्या संवर्धनासाठी या संमेलनातील चर्चेच्या निष्कर्षातून योग्य कृती आराखडा तयार करावा, अशा सुचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

वन अकादमी येथे 35 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकुमार जोग, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम, डॉ. जयंत वडतकर, इको – प्रो चे बंडू धोत्रे, निनाद शहा, ग्रीन प्लॅनेटचे डॉ. सुरेश चोपणे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनात चर्चा, संवाद, मंथन होणार आहे. त्याच्या निष्कर्षातून भविष्यातील कामाचा वेध घेऊन पक्षी संवर्धनासाठी योग्य नियोजनाची सुरवात होईल, असा विश्वास व्यक्त करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, पक्षांचे आवाज, त्याचे देखणे स्वरुप यापासून मनुष्याला आनंद मिळतो. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे पक्षांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहे. त्यासाठी मानव जबाबदार आहे. कितीही आधुनिक झालो तरी ज्या पर्यावरणीय बदलाची मानवाला चाहूल लागत नाही, त्या बाबी पक्षांना आपल्या पहिले कळतात. पक्षांमुळे पृथ्वीतलावरील हालचालींची माहिती मिळण्यास मदत होते.

वाढत्या प्रदुषणामुळे किंवा पर्यावरणाच्या असंतलुनामुळे पक्षांच्या 265 प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. 2000 ते 2022 या कालावधीत पर्यावरण संतुलन बिघडल्याने आणि प्रदुषणामुळे मृत्युच्या संख्येत 300 पटींनी वाढ झाली आहे. कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मानवाची बदललेली जीवनशैलीसुध्दा त्याला कारणीभुत आहे. पक्षांची जीवन साखळी बिघडली तर मानवी जीवनाचे संतुलन बिघडेल. पक्षी, किटक हे अन्नसाखळीचे प्रमुख घटक आहेत. माळढोक, सारस व इतर पक्षांच्या संवर्धनासाठी योग्य कृती आराखडा तयार करावा. या संमेलनात मनापासून निघालेल्या निष्कर्षामुळे वनापर्यंत पोहचण्यास मदत होईल. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात पक्षाचे प्रदर्शनी केंद्र उभे करण्याचे नियोजन करा. यात पक्षांच्या छायाचित्रांचे सुंदर प्रदर्शन करता येईल. तसेच पक्षांच्या फोटोसंदर्भात राज्यव्यापी स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांना आकर्षक बक्षीसे द्यावीत.

पुढे मुनगंटीवार म्हणाले, पर्यावरणाच्या संवर्धनासंदर्भात जी - 20 देशातील प्रतिनिधींची वन अकादमीमध्ये बैठक होणार आहे. ही चंद्रपूरकरीता अभिमानाची बाब आहे. आज येथे अनेक पुस्तकांचे विमोचन झाले. यापुढेही अशाप्रकारच्या अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लेखन व्हावे. त्यामुळे पर्यावरण, वन्यप्राणी व पक्षांबद्दल ज्ञान मिळेल. पक्षी संवर्धनात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात बंडू धोत्रे म्हणाले, चंद्रपुरात पहिल्यांदाच पक्षीमित्र संमेलन होत आहे. माळढोक आणि सारस पक्षाचे संवर्धन हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. चंद्रपुरात कधीकाळी सारस पक्षाचे अधिवास होते. आता जिल्ह्यात वाघांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पक्षांच्या प्रजाती नष्ट होण्यापूर्वीच त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भिमाशंकर कुळकर्णी यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार, प्रा. जयवर्धन बलखंडे यांना पक्षीसंशोधन पुरस्कार, राजकुमार कोळी यांना पक्षीसंवर्धन पुरस्कार, अनंत पाटील यांना पक्षी जनजागृती पुरस्कार तर अमृता आघाव व यशस्वी उपरीकर या विद्यार्थीनींना उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी सुधाकर पुराठे लिखित महाराष्ट्र पक्षीमित्र स्मरणिका, प्रफुल सावरकर लिखीत निसर्गसंवाद, किरण मोरे लिखीत शबल, डॉ. रवी पाठेकर लिखीत अर्थवन आणि पक्षीवेध या पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी तसेच राज्यभरातील पक्षीप्रेमी यांची उपस्थिती होती.

  Print


News - Chandrapur
Related Photos