बीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी उद्या ३ डिसेंबर  पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत. 
 ‘स्पर्धेच्या’ नावाने खाजगी कंपन्यांची मक्तेदारी लादली गेली. आउटगोइंग कॉल १८ रुपये, तर इनकमिंग कॉल ९ रुपये एवढे प्रचंड दर आकारून या कंपन्यांनी जनतेची अक्षरश: लूूट केली. खासगी कंपन्यांनी विदेशातून येणारे कॉल देशातून आल्याचे दाखवून बीएसएनएल या सार्वजनिक कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले.
बीएसएनएलला मोबाइल सेवेसाठी परवानगी मिळावी, म्हणून या खात्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र अनेक आंदोलने केली. २००२ मध्ये बीएसएनएल कंपनीचा मोबाइल क्षेत्रात प्रवेश झाला. सर्वप्रथम बीएसएनएलने इनकमिंग कॉल फ्री केला, दर कमी केले आणि सामान्यांच्या हाती मोबाइल दिसू लागला. कृषी प्लॅनसारखी योजना अत्यंत लोकप्रिय झाली आणि खेड्यापाड्यांत व दुर्गम भागात मोबाइलचा अफाट विस्तार झाला. अवघ्या तीनच वर्षांत त्या काळातील आघाडीच्या खासगी कंपनीला मागे टाकून बीएसएनएल पुढे जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली. येथूनच बीएसएनएलला संपविण्याचे कारस्थान सरकारी पातळीवर झाले.
बीएसएनएलला २००४-०५ मध्ये १० हजार कोटींचा नफा झाला. २००७-०८ मध्ये ९५ मिलियन मोबाइल लाइनचे टेंडर रद्द करून सरकारने बीएसएनएलवर मोठा आघात केला. झपाट्याने होऊ पाहणाºया विस्ताराला एकदम ब्रेक लावला गेला. पुन्हा एकदा सर्व संघटनांनी देशव्यापी संप करून अंशत: का होईना, सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. यानंतर मात्र, सरकारने एडीसी चार्जेस रद्द केले. बीडब्ल्यूए स्पेक्ट्रमच्या नावाने १८,५०० कोटी रुपयांसह ३० हजार कोटींची गंगाजळी काढून बीएसएनएलला कफल्लक बनविले.
बीएसएनएलला बंद करून मर्जितल्या खासगी कंपनीला ग्राहकांना वाटेल तसे लुटण्याचाच परवाना देण्यासाठी हा खटाटोप आहे. ग्राहकांच्या विश्वासावर आम्ही आजवर वाटचाल सुरू ठेवली. ६५ हजार टॉवर्स वेगळे करून बीएसएनएलला मोडीत काढण्याचे धोरण हाणून पाडले. त्या विरोधात देशातील २ लाख कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लढ्याचे रणशिंग फुंकले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-02


Related Photos