आरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मिथून धोडरे / ठाणेगाव :
मागील अनेक महिन्यांपासून आरमोरीकरांना प्रतीक्षा असलेल्या नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मुंबई येथे नगर विकास विभागाच्या दालनात पार पडली. आरक्षण सोडतीनुसार आरमोरी नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे प्रथम नगराध्यक्षाचा मान अनुसूचित जमातीला मिळणार असून आरक्षण सोडतीकडे लक्ष ठेवून निवडणूकीत नशिब आजमावण्याचे अनेक दिग्गजांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
मंत्रालयात नगर विकास खात्याचे राज्यमंत्री ना. रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली काल ४ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नगर विकास विभागाचे अवर सचिव सहस्त्रबुध्दे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, माजी आ. रामकृष्ण मडावी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हरीष मने, तहसीलदार तथा नगर परिषदेचे प्रशासक यशवंत धाईत, मुख्याधिकारी सतिश चौधरी उपस्थित होते. 
नगर परिषदेच्या पहिल्या निवडणूकीसाठी नगरसेवक पदाच्या आरक्षणाची प्रभागनिहाय सोडत प्रशासनाच्या वतीने अडीच महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या सोडतीची प्रतीक्षा राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांना लागली होती. आता नगराध्यक्षपदाची सोडत काढण्यात आल्यानंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले आहे. सदर आरक्षण अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांना धक्का बसला आहे. सर्वच पक्षांना आता नवख्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-05


Related Photos