ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचं वृद्धापकाळामुळे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चार दशकांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पुरंदरे प्रकाशनाचे अमृत पुरंदरे, लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे असा परिवार आहे.
मागील काही वर्षांपासून निर्मला पुरंदरे या आजारी होत्या. बडोदा येथे ५  जानेवारी १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांच्या त्या भगिनी होत. पुरंदरे यांनी पुणे जिह्यातील आयआयएम ट्रस्टच्या माध्यमातून फुलगाव येथे निराश्रित विद्यार्थ्यांसाठी बालसदनाची स्थापना केली होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘वनस्थळी’ या संस्थेच्या त्या संस्थापिका होत्या. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी काम केले. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुमारे २५० बालवाडय़ा सुरू केल्या. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखनदेखील केले. ‘स्नेहयात्रा’ हे त्यांचे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्रमंडळाच्या माध्यमातूनही निर्मलाताईंनी मोलाचे योगदान दिले होते.
ग्रामीण भागामध्ये सहायक विद्यार्थी समिती आणि वनस्थळी या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम केले होते. या कामाच्या माध्यमातूनच त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयांत ११ हजारांहून अधिक बालवाडी शिक्षकांना घडवले. त्यांच्या सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय, आदिशक्ती आणि सावित्रीबाई पुरस्कारानेदेखील त्यांना गौरविण्यात आले होते.
  Print


News - Rajy | Posted : 2019-07-21


Related Photos