एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस


-  यावर्षी २२ हजार २६९ कोटी लिटर पाणी या उपक्रमातून साठविल्याचे जाहीर
- सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पुणे येथे संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
  प्रतिनिधी / पुणे :
एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पानी फौंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८’ मध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी (आंधळी) गावाला ७५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. ७५ तालुक्यांतील सुमारे चार हजार गावांनी या उपक्रमातून यावर्षी २२ हजार २६९ कोटी लिटर पाणी साठविल्याचे जाहीर करण्यात आले.   
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा २०१८ सालचा पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडीच्या क्रीडा संकुलात आज पार पाडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबरच पानी फौंडेशनचे अध्यक्ष अभिनेते अमीर खान, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, जलसंपदा मंत्री राम शिंदे राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पानी फौंडेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ व्यासपीठावर उपस्थित होते.
५० लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार माणमधील भांडवली आणि मोताळा तालुक्यातील सिंदखेड यांना विभ्गुन देण्यात आला. तर ४० लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार आष्टी तालुक्यातील आनंदवाडी आणि नारखेड तालुक्यातील उमठा गावाला विभ्गुन देण्यात आला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “जलसंधारणाची चळवळ ही लोकचळवळ झाली तरच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. लोक एकत्र आले तरच काम होते, हे या स्पर्धेमुळे पुढे आले आहे. कोणतीही योजना ही सरकारी न राहता लोकांची होणे गरजेचे आहे. एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची आपण सगळेच निर्मिती करू.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की या स्पर्धेचे काम आत्ता ७५ तालुक्यांमध्ये झाले आहे, ते यापुढे १०० तालुक्यांमध्ये व्हावे. तसेच पाण्याचा वापर योग्य रीतीने व्हावा यासाठी यापुढे पीक पद्धती बदलण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळालेल्या गावाला २५ लाख रुपये, दुसरा पुरस्कार मिळालेल्या गावाला १५ लाख रुपये आणि तिसरे पुरस्कार मिळालेल्या गावाला १० लाख रुपये राज्य सरकारतर्फे देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  
पानी फौंडेशनच्या कामामागची प्रेरणा सांगून सांगून अमीर खान म्हणाले, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करून पाणीदार करण्याचे महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांचे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे.
या उपक्रमात आलेले अनुभव सांगून अमीर खान म्हणाले, की ही प्रक्रिया किती काल चालेल, हे सांगता येत नाही मात्र या उपक्रमाची प्रक्रिया, हा अतिशय आनंदाचा भाग आहे.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्रात लोक एकत्र आले तर काहीच अशक्य नाही, हे अमीर खान यांनी दाखवून दिले आहे. अनेकवर्षे शासकीय योजना यशस्वी झाल्या नसतानाही, हा उपक्रम केवळ लोक सहभागी झाल्याने यशस्वी झाला आहे. 
अमीर खान यांनी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून अजित पवार म्हणाले, की हे काम राजकारण विरहीत असले पाहिजे. पुढच्यावर्षी निवडणुका असल्या तरीही हा उपक्रम सुरु राहायला हवा.
पुढे बोलताना अजित पवार यांनी, पाणी योग्य रीतीने वापरण्यासाठी, पिक पद्धती बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, की या उपक्रमातून पाणी वाचविल्यानंतर ऊस, केली यांसारखी पिके वाढली, की पाण्याचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर उपसा होईल. ते थांबविण्यासाठी काम केले पाहिजे.
राज ठाकरे म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे जात, पक्ष आणि मतभेद यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आहे. लोकांचा या उपक्रमातील सहभाग महत्वाचा आहे.”
उपस्थित प्रेक्षकांनी आग्रह केल्यानंतर, या उपक्रमामध्ये श्रमदान करण्यासाठी पुढच्यावर्षी सहभागी होणार असल्याचेही, राज ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हाणाले, “इतक्या वर्षांच्या राजकारणातून जे शक्य झाले नाही, ते या उपकारामातून शक्य झाले आहे. आपण सगळेच माहाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्र येऊयात.”
विजय शिवतरे म्हणाले, की या उपक्रमातून जलसंधारणाबरोरच मन संधारणाचेही काम झाले आहे.  सत्यजित भटकळ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की प्रत्येक गावाने आपापले पाणी साठविले तरच माहाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकेल, यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, हा विचार या उपक्रमामागे आहे. या उपक्रमची प्रशिक्षण, श्रमदान आणि आनंद, ही त्रिसूत्री असल्याचेही त्यांनी सांगितले.
७५ तालुक्यांतील चार हजार गावांनी या उपक्रमातून यावर्षी २२ हजार २६९ कोटी लिटर पाणी साठविल्याचे जाहीर करण्यात आले. या पाण्याची किंमत सुमारे ४ हजार ४५४ कोटी रुपये असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तर पानी फौंडेशनबरोबर या उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी १ हजार ६५० जेसीबी मशिनने काम केल्याचे, यावेळी सांगितले.
यावेळी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. या उपक्रमामध्ये एकेकटे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर माहिती देऊन, त्यावर तयार करण्यात आलेल्या गाण्याची चित्रफीत किरण राव यांनी यावेळी सादर केली.
अभिनेते जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी पुरस्कार सोहळ्याचे निवेदन केले. संगीतकार अजय-अतुल यांनी झिंगाट आणि इतर गाणे सादर करून सोहळ्यात रंगत आणली. यावेळी सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, आशुतोष गोवारीकर, पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर आदी सिनेकलाकार उपस्थित होते.

   Print


News - Rajy | Posted : 2018-08-13


Related Photos