महत्वाच्या बातम्या

 दिल्ली सरकारचा मोठा निर्णय : शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लोकांना चावा घेऊन रेबिजसारख्या आजाराची लागण होऊन मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने दिल्लीमधील शिक्षकांना शाळेतील आणि आजुबाजूच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षकांना मोजणीची जबाबदारी -
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार, सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षकांना शाळेच्या आवारात तसेच बाहेरील परिसरातील भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचे काम सोपवले गेले आहे.

शिक्षकांना शाळेतील आणि परिसरातील कुत्र्यांच्या संख्येवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना हे देखील पाहण्यास सांगितले गेले आहे की, कुठे मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांची उपस्थिती आहे आणि ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात का.

शिक्षकांनी जर कुठे भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आढळली, तर ती त्वरित संबंधित विभागांना कळवायची आहे, ज्यामुळे महानगरपालिका किंवा पशू विभाग वेळेवर योग्य कारवाई करू शकतील.

शिक्षक संघटनांची नाराजी -
तर दुसरीकडे, अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण संघटनांचे म्हणणे आहे की, शिक्षकांचे मुख्य कार्य शिक्षण देणे आहे, भटक्या कुत्र्यांची मोजणी करणे हे त्यांचे कार्य नाही. अनेक शिक्षकांनी या निर्णयाला विरोध करत, यासाठी वेगळा स्टाफ किंवा एजन्सी नियुक्त केली पाहिजे असे सूचवले आहे.

सोशल मीडियावर देखील या निर्णयावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या निर्णयाला समर्थन देत आहेत, तर काही याबाबत सरकारच्या निर्णयाची पुनरावलोकनाची मागणी करत आहेत.

मुलांच्या सुरक्षेसाठी पाऊल -
सरकारने घेतलेला हा निर्णय मुलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेतल्यावर प्रशासनाने वेळेत आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी शिक्षकांना हे जबाबदारी सोपवली आहे.

आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की, या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्या किती प्रमाणात कमी होतात आणि शिक्षकांचे कार्य यशस्वी होईल का.





  Print






News - World




Related Photos