कोंबड्यांच्या झुंजीत पैशांची बाजी : राजुरा पोलिसांचा छापा, पाच दुचाकींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रामपूर ते माथा मार्गालगत जंगल परिसरात कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशांची बाजी लावत जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच झुंजी लावणारे इसम घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मोटारसायकली, जखमी कोंबडा आणि झुंजीसाठी वापरण्यात येणारी लोखंडी काती असा एकूण ५ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१८ सप्टेंबर रोजी राजुरा पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. यावेळी रामपूर ते माथा मार्गालगतच्या जंगल परिसरातील मोकळ्या जागेत काही इसम कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशांची बाजी लावत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
पोलिस पथक घटनास्थळाजवळ पोहोचताच तेथे कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या इसमांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र जंगल परिसराचा फायदा घेत संबंधित इसम पसार झाले.
त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी तेथे एक जखमी कोंबडा, कोंबड्यांच्या झुंजीसाठी वापरण्यात येणारी लोखंडी काती आणि पाच मोटारसायकली आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच-३४-सीपी-६६७५, एमएच-३४-सीएम-१२६५, एमएच-३४-एटी-६७४४, एमएच-३४-टी-६९४१ आणि एमएच-३४-सीपी-६३२३ या मोटारसायकलींचा समावेश आहे. पाचही वाहनांची किंमत सुमारे चार लाख ९९ हजार रुपये असून, जखमी कोंबडा व लोखंडी कातीसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी कोंबड्यांची झुंज लावून पैशांची बाजी लावत जुगार खेळल्याप्रकरणी संबंधित फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध राजुरा पोलिसांकडून सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.




Petrol Price




