महत्वाच्या बातम्या

 मुंबईत प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन : महापालिकेने वसूल केला ६.९ लाखांचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईत विकासकांकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. १ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान, पालिकेने प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर ६ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

चेंबूर, विक्रोळी आणि माहुल येथील विकासकामांच्या ठिकाणी प्रदूषणाचे नियम सर्वाधिक उल्लंघन झाले असून, त्या ठिकाणी १ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

महापालिकेने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदूषण नियंत्रणासाठी २८ मुद्द्यांचा समावेश असलेली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर ९४ भरारी पथकांची नियुक्ती केली होती. तथापि, वर्ष उलटूनही विकासक आणि प्राधिकरणांकडून या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झालेले नाही. अनेक बांधकामस्थळी सात दिवसांची नोटीस बजावल्यानंतरही नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

परिणामी, पालिका पर्यावरण विभागाने काम बंद करण्याच्या नोटीसाद्वारे कारवाई सुरू केली असून, मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लंघन केल्यास १० हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर हा दंड वाढवून एक लाख रुपयांपर्यंत करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

वांद्रे पूर्वेत कचरा जाळण्याच्या तक्रारींमध्ये वाढ -
१ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान, मुंबईमध्ये उघड्यावर कचरा जाळण्याच्या तक्रारींमुळे पालिकेने ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या तक्रारी सर्वाधिक वांद्रे पूर्व, सांताक्रूझ पूर्व आणि खार पूर्व विभागांमधून आल्या आहेत.

इंधन भेसळीवर कडक कारवाईचा इशारा -
पालिका आणि एमपीसीबीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये पाच वर्षांपेक्षा जुनी आणि भेसळ असलेले इंधन वापरणारी वाहने रडारवर ठेवण्यात येतील. एमपीसीबी, वाहतूक पोलिस आणि पालिकेच्या संयुक्त बैठकीत यावर पुढील कारवाई ठरविण्यात आली आहे.

एकूण वसूल दंड -
स्वच्छता उल्लंघनासाठी – ६ लाख ९० हजार १०० रुपये
कचरा जाळण्यावर – ३२ हजार ५०० रुपये

महापालिका प्रदूषणाच्या समस्या सोडवण्यासाठी कडक कारवाईची धडक देत आहे आणि मुंबईकरांना प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos