गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २ लाख ८५ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क


- ८ हजार २२३ नवमतदारांचा समावेश
- आदर्श आचारसंहीतेचे काटेकोरपणे पालन करावे
- निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत २ लाख ८५ हजार ७०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये १ लाख ४५ हजार ७४६ पुरूष आणि १ लाख ३९ हजार ६९१ महिला मतदारांचा समावेश आहे. ८ हजार २२३ नवमतदार  या निवडणूकीत मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाकडून प्राप्त सुचनांचे योग्यरित्या पालन केले जात आहेत. सर्व उमेदवारांनी तसेच राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
डाॅ. जाखड यांनी आज २२ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून विधानसभा निवडणूकीसंदर्भात माहिती दिली. 
येत्या २७ सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिसुचना जाहीर होईल. २७ सप्टेंबर ते ४  ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. यादरम्यान २८, २९ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर  ला शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशन भरता येणार नाहीत. ५ ऑक्टोबर  रोजी नामनिर्देशनपत्रांची छाणणी होईल. तर ७ ऑक्टोबर  रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 
उमेदवारांना चिन्हे मिळाल्यानंतर १९ ऑक्टोबर  पर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूकीच्या ४८ तास आधी प्रचार बंद करावा लागणार आहे. निवडणूकीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होउ नये याकरीता राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याबाबत, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बाबत माहिती देण्यात आली.
मतदान केंद्रांवर निवडणूकीच्या एक तासाआधी माॅक पोल घेण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सकाळी ६ वाजता सबंधित मतदान केंद्रावर उपस्थित रहावे. जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेता सकाळी ७  ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची वेळ ठेवण्याची विनंती निवडणूक विभागाकडे केली आहे. यावर निवडणूक विभागाकडून प्राप्त सूचनांनुसार निर्णय घेतल्या जाईल, अशी माहिती डाॅ. इंदूराणी जाखड यांनी दिली. 
प्रचार साहित्य प्रकाशित करण्याबाबत प्रिंटींग प्रेस व्यावसायीकांची बैठक घेण्यात आली असून प्रचार साहित्य छपाईबाबत माहिती देण्यात आली आहे. ७२ तासात प्रतिज्ञापत्र निवडणूक विभागाकडे सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रचार साहित्यावर प्रकाशकाचे नाव, प्रती स्पष्टपणे नमुद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 
प्रचारादरम्यान रात्री १० वाजतापर्यंतच लाउडस्पीकरचा वापर करता येणार आहे. याव्यतिरीक्त प्रचार करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच प्लाॅस्टीकमुक्त निवडणूकीचे आवाहन करीत प्लाॅस्टिकचे साहित्य न वापरण्याबाबत राजकीय पक्ष, उमेदवारांना सुचना देण्यात आल्या आहेत. 
आचारसंहीता लागू झाल्यापासून विविध पथके कार्यरत झाली आहेत. प्रत्येक कार्यवाहीचे व्हीडीओ चित्रीकरण केले जात आहे. ज्या ठिकाणी आचारसंहीतेचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळेल तिथे सबंधित पथक पोहचून कार्यवाही करेल. त्याचा अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. भरारी पथके, नाकाबंदी, वाहनांची तपासणी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन अशी सहा पथके असल्याची माहिती डाॅ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

सी - व्हीजिल ॲपवर करता येणार आचारसंहीता भंगाची तक्रार

आदर्श आचारसंहीतेचे उल्लंघन होत असल्याबाबत जागरूक नागरीक म्हणून तक्रार करण्यासाठी सी - व्हीजिल ॲप निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे व्हीडीओ, ॲडीओ आणि फोटोच्या माध्यमातून आचारसंहीतेच्या उल्लंघनाबाबत तक्रार करता येणार आहे. प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपपवर केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल. मात्र यावर जुने फोटो, व्हीडीओ किंवा अन्य माहिती अपलोड केल्यास त्यावर कारवाई होणार नाही, अशी माहिती डाॅ. जाखड यांनी दिली.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३४६ मतदान केंद्र

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये चामोर्शी तालुक्यात १६३ , धानोरा तालुक्यात ५२ तर गडचिरोली तालुक्यात १३१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदारांना मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य ११ पुराव्यांच्या आधारे मतदान करता येणार आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-22


Related Photos