महत्वाच्या बातम्या

 भंडाऱ्यात १ सप्टेंबरपासून मोटर रिवाइंडिंगचे मोफत प्रशिक्षण


- स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम; प्रशिक्षणार्थींना भोजन, साहित्य व निवासाचीही मोफत सुविधा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / भंडारा : बेरोजगार युवक-युवती तसेच स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या नागरिकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि बँक ऑफ इंडिया प्रायोजित बी.ओ.आय. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने मोटर रिवाइंडिंगचे ३० दिवसीय मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला १ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. मोटर रिवाइंडिंग क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. 

प्रशिक्षणादरम्यान विद्युत उपकरणांची मूलभूत माहिती, विद्युत दुरुस्ती करताना घ्यावयाची सुरक्षितता, प्रतिरोध, वाहक, विद्युतरोधक व अर्धवाहक यांसह विद्युत क्षेत्रातील प्राथमिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय मोटर रिवाइंडिंगसाठी आवश्यक असलेली विविध साधने व उपकरणे, विद्युत निर्मितीचे प्रकार, व्होल्टमीटर व ॲमीटरच्या माध्यमातून व्होल्टेज तपासण्याच्या पद्धती, श्रेणी व समांतर जोडणी, असेंब्ली स्विचेस, सेट पॅनल बोर्ड वायरिंग आदी विषयांचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला आहे.

विविध प्रकारच्या मोटर रिवाइंडिंगचे प्रशिक्षण -
प्रशिक्षणार्थींना इलेक्ट्रिक मोटरच्या प्रतिमिनिट फेऱ्यांची माहिती, मोटरमधील ध्रुव व ध्रुव प्रणालीचे कार्य, ध्रुवांमध्ये कॉइलचे विभाजन, मोटरमधील स्लॉटची संख्या, वेगवेगळ्या प्रकारच्या स्लॉट व ध्रुवांसाठी पिचचे प्रकार याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच टेबल फॅन वायंडिंग, सीलिंग फॅन, सिंपल पोल मोटर, कूलर फॅन यांची वायंडिंग करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर टेस्टिंग बोर्ड तयार करणे, वायंडिंग डेटा समजून घेणे आणि प्रत्यक्ष मोटर रिवाइंडिंगच्या कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणार्थींना विविध सुविधा मोफत -
या प्रशिक्षणाची विशेष बाब म्हणजे प्रशिक्षणार्थींना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रशिक्षणादरम्यान जेवण, चहा, नाश्ता, वही, पुस्तके तसेच राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या इच्छुक उमेदवारांनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

१८ ते ५० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना संधी -
स्वयंरोजगाराची आवड असणाऱ्या, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असणाऱ्या तसेच कौशल्य प्राप्त करून रोजगाराची संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना या प्रशिक्षणासाठी सहभागी होता येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या मुलाखतीला येताना इच्छुक उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधारकार्ड आणि मनरेगा जॉब कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे संस्थेने कळविले आहे.

१ सप्टेंबरला मुलाखती -
प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण बी.ओ.आय. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादूर शास्त्री मनपा शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे आहे. या मोफत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे निर्देशक मंगल निमजे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
९५११८७५९०८, ८६६९०२८४३३, ९७६६५२२९८४, ८४२१४७४८३९





  Print






Related Photos