महत्वाच्या बातम्या

  किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञातने लावली आग : १० लाखांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथे किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करून आग लावल्याची घटना २० सप्टेंबर रोजी रात्री घडली. या आगीत दुकानातील किराणा माल, टीव्ही, कूलर, फर्निचर आणि रोख रक्कम जळून खाक झाली असून सुमारे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुर्डीहेटी येथील संघराज केशव तेलसे यांचे गावात किराणा दुकान असून त्यात सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा किराणा माल साठवून ठेवण्यात आला होता. भाच्याच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तेलसे हे १८ सप्टेंबर रोजी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. घरात त्यांची आई जिजा तेलसे उपस्थित होत्या.

२० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जिजा घराबाहेर आल्या असता त्यांना दुकानाच्या शटरमधून धूर निघताना दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. दुकानाच्या बाजूच्या शटरचे कुलूप तुटलेले आणि शटर अर्धवट उघडे दिसून आले. आत पाहिले असता दुकानात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणातील किराणा माल, टीव्ही, कूलर आणि फर्निचर आगीत जळून खाक झाले होते.

या घटनेत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा किराणा माल, १.५० ते २ लाख रुपयांचे टीव्ही, कूलर व फर्निचर तसेच ३० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम जळून नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. दुकानातील वही-खाते आणि दुकानाचा परवानाही आगीत जळून खाक झाला. अज्ञात व्यक्तीने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून किराणा मालाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत आहेत.






  Print






Related Photos