महत्वाच्या बातम्या

 भरधाव दुचाकीच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी : नागपुरात मृत्यूशी झुंज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर : चिमूर-मिसी महामार्गावरील खापरी धर्मू गावाजवळ भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ५३ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून, नागपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

मारोती सदाशिव सोनवणे ५३ वर्ष , रा. मिनघरी, ता. चिमूर असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ते पत्नी शालू सोनवणे यांच्यासह खापरी धर्मू शिवारातील शेतात सीताफळे तोडण्यासाठी गेले होते. सीताफळे तोडल्यानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोघेही हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रं एमएच ३४ बीई ४१२१ ने चिमूर बाजारात सीताफळे विक्रीसाठी निघाले होते. दरम्यान, खापरी धर्मू गावाजवळ चिमूरकडून भिसीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मारोती सोनवणे यांच्या डोक्याला, डाव्या कानशिलाजवळ आणि उजव्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

अपघाताची माहिती मिळताच त्यांचा मुलगा सागर सोनवणे घटनास्थळी पोहोचला. त्याने तातडीने खासगी वाहनाने वडिलांना चिमूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविले. सध्या त्यांच्यावर नागपूर येथील निरामय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुलगा सागर मारोती सोनवणे याने भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.





  Print






Related Photos