समलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली: दोन सज्ञान व्यक्तींमधील समलैंगिक संबंध अपराध ठरू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा ऐतिहासिक निकाल दिला. या निकालामुळे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम ३७७ रद्द झालं.
समलैंगिकता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिकानांही मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार आहे. आता जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटले  आहे. ३७७  कलम म्हणजे मनमानीपणा असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. 
सर्वोच्च न्यायालयानं कलम ३७७ रद्द करत स्वत:चा डिसेंबर २०१३ मध्ये दिलेला निकाल बदलला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठानं १० जुलैपासून या विषयावर सुनावणी सुरू केली. ही सुनावणी १७ जुलै रोजी संपली. यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता.   Print


News - World | Posted : 2018-09-06


Related Photos