वृंदावन नगरातील अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर धाड : ५१ सिलेंडर जप्त


- आप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर पुरवठा विभागाची कारवाई; ग्राहकांची फसवणूक आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील वृंदावन नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला. टिनाच्या गोडाऊनमध्ये भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कारवाईत ४३ घरगुती आणि ८ व्यावसायिक असे एकूण ५१ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. वृंदावन नगरातील या अवैध अड्ड्यावर काही दिवसांपासून लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा माग काढून अन्नधान्य वितरण विभाग तसेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित यंत्रणांनी कारवाई केली.
या ठिकाणी विशेष नोझलच्या सहाय्याने भरलेल्या सिलेंडरमधून गॅस काढून दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलेंडरमध्ये दोन ते अडीच किलोपर्यंत गॅस कमी मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अन्नधान्य वितरण अधिकारी सुमेर चवरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर पुरवठा विभागाच्या पथकाने अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात सिलेंडर जप्त करण्यात आले. जप्त सिलेंडर गोपिका इंडेन गॅस एजन्सीशी संबंधित असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. दरम्यान, गॅस एजन्सींमधून ग्राहकांच्या घरासाठी निघणारी वाहने या ठिकाणी येत होती का, तसेच या अवैध रिफिलिंगमध्ये एजन्सीतील कर्मचारी किंवा इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना मोठा सुरक्षा धोका निर्माण होतो. गॅस गळती अथवा आग लागल्यास परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे हा अड्डा किती दिवसांपासून सुरू होता आणि या रॅकेटमागे नेमके कोण आहेत, याचा तपास प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येणार आहे. .या प्रकरणातील संबंधित व्यक्तीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. कारवाईत अधिकारी अमित खडतकर व अरविंद शेंडे यांच्यासह पथक सहभागी होते.




Petrol Price




