चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल


- तारण ठेवलेल्या जमिनीच्या विक्रीची परवानगी देण्यासाठी मागितली एक लाखाची लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी / चंद्रपूर
: तारण असलेली शेतजमिन विक्री करण्याची परवानगी देण्यासाठी १ लाख रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती विठोबा पोटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शेती तसेच प्लाॅट खरेदी - विक्रीचा व्यवसाय करतो. तक्रारदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या भद्रावती शाखेतून २०१२  मध्ये तारण ठेवून ४५  लाख रूपये कर्ज घेतले होते. कर्जामध्ये तारण असलेल्या शेतजमिनीपैकी १.५ एकर जमिनीची विक्री करण्याची तसेच उर्वरीत शेतजमिन तारण ठेवून खात्याचे नुतणीकरण करून परवानगी मिळण्यासाठी बॅंकेच्या चंद्रपूर येथील मुख्य कार्यालयास १९  सप्टेंबर २०१८  रोजी अर्ज सादर केला होता. अर्ज १२  सप्टेंबर रोजी बॅंकेच्या मासिक सभेमध्यचे मंजूर करण्यात आला. मात्र बॅंकेच्या मासिक सभेच्या ठरावास अनुसरून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पोटे यांनी तक्रारदारास १ लाख रूपयांची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  २८  सप्टेंबर रोजी सदर प्रकरणाची पडताळणी केली. दरम्यान प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पोटे यांनी  १ लाख रूपये लाच मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली. याप्रकरणी आज १०  आॅक्टोबर रोजी त्यांच्याविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे , पोलिस हवालदार मनोहर एकोणकर, नापोकाॅ संतोष येलपुलवार, सुभाष गोहोकर, पोलिस शिपाई रविंद्र ढेंगळे, महिला पोलिस शिपाई समिक्षा ढेंगळे, चालक राहुल ठाकरे आदींनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-10


Related Photos