अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चोरट्यांना भिसी पोलीसांनी केले जेरबंद : लाखोंचा मुद्देमाल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या २१ स्पॅन अॅल्युमिनियम तारेची चोरी करणाऱ्या टोळीचा भिसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, चोरीच्या अॅल्युमिनियम तारेसह गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन व दुचाकी असा एकूण ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
भिसी येथील वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कृपाल महादेव लांजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टिटवी शेतशिवारात कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीवरील २१ स्पॅन अॅल्युमिनियम तार १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. चोरी झालेल्या तारेची किंमत सुमारे १ लाख ५१ हजार रुपये होती.
याप्रकरणी भिसी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सदर चोरी मनिष ऊर्फ चंद्रभान सुभाष वाकडे २९ वर्ष रा. पारडपार, ता. चिमूर व फरार आरोपी सोमेश्वर काशिनाथ चौधरी यांनी केल्याचे निष्पन्न झाले. चोरी केलेली अॅल्युमिनियम तार त्यांनी जांभुळघाट येथील भंगार व्यावसायिक स्वप्निल सुनील हजारे २० वर्ष व कुणाल गणेश हजारे १९ वर्ष यांना विकल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी स्वप्निल हजारे, कुणाल हजारे आणि मनिष ऊर्फ चंद्रभान वाकडे यांना २० ऑगस्ट रोजी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी चोरी गेलेली २१ स्पॅन अॅल्युमिनियम तार किंमत १ लाख ५१ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन किंमत ५ लाख रुपये आणि स्प्लेंडर मोटारसायकल किंमत ५० हजार रुपये, असा एकूण ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी सोमेश्वर काशिनाथ चौधरी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वेश बेलसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे, भिसीचे ठाणेदार, तसेच पोलीस अंमलदार नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, अमोल सावे, गजानन मडावी, बाळकृष्ण जिभकाटे, सुनील घोडमारे, सतीश झिलपे, मंगेश चौधरी व वैभव गोहणे यांनी केली.




Petrol Price




