महत्वाच्या बातम्या

 उत्पन्नाची चिंता सतावत असलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या


- फुकटा शिवारातील घटना; विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श करून जीवन संपविले शेतकऱ्याची आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतीतून यंदा उत्पन्न कसे मिळणार, पिकाचे काय होणार आणि पुढील संसार कसा चालवायचा, या चिंतेने त्रस्त असलेल्या २८ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्वतःहून स्पर्श करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना फुकटा शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव नितीन नरेश सुपारे २८, रा. सोनेगाव राऊत असे आहे. नितीन यांची फुकटा शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात पीक उभे होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळणार की नाही, याची चिंता नितीन यांना सतावत होती.

शेतीतून उत्पन्न मिळाले नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत ते असल्याचे सांगण्यात येते. याच नैराश्यातून नितीन हे शेतात गेले. तेथे त्यांनी शेतातील विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्वतःहून पाय लावला. विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी वडनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण आणि घटनेच्या परिस्थितीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे उत्पादन धोक्यात येत असताना एका तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos