महत्वाच्या बातम्या

 नागपूर कारागृहात कैद्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मोक्का प्रकरणात कारागृहात असलेल्या कैद्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकाराने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कैद्यांनी चांगलाच गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काही कैद्यांनी तुरुंगरक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे या कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तुरुंग अधिकाऱ्याला घेराव घातल्याचीही माहिती आहे.
सौरभ तायवाडे वय 24 वर्षे, रा.पाचपावली असे मृताचे नाव आहे. तो पाचपावली ठाण्यातील मोक्काचा आरोपी आहे. शुक्रवारी 9 डिसेंबर सकाळी त्याच्या छातीत दुखत असल्याची माहिती त्यांनी तुरुंगरक्षकाला दिली. मात्र, तुरुंगरक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तो जेवणाच्या रांगेत उभा असतानाही त्याने त्यांना त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देत, दवाखान्यात नेण्यासाठी सांगितले. मात्र, रक्षकाने त्याला कानाखाली चापट मारली. यामुळे तो खाली पडला आणि त्याची प्रकृती अधिकच बिघडली. दरम्यान शुक्रवारी त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी कारागृहातील कैद्यांन कळताच 70 ते 80 कैद्यांनी याबाबत रोष व्यक्त करत तुरुंग अधिकारी कुमरे यांना घेराव घातला.
याशिवाय कारागृह रक्षकाने मारहाण करुन दिरंगाई केल्याने सौरभचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बराकीत न जाण्याची धमकीही इतर कैद्यांनी दिली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. कुमरे यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांचा ताफा कारागृहात दाखल झाला. पोलिसांनी सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर कैदी आपापल्या बराकीत गेले. या घटनेची माहिती काराागृह प्रशासनाने आधी लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर यासंदर्भात माहिती समोर आली.

यापूर्वीही मारहाणीच्या अनेक घटना
काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती कारागृहात मानेवाडा येथील रहिवासी असलेला एक युवक खुनाच्या आरोपात कैद होता. त्याच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. पिण्याच्या पाण्यावरुन झालेल्या वादात तुरुंगरक्षकाने त्या तरुणाला मारहाण केली होती. यानंतर संबंधीत तरुणाने ही माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविली होती. त्यानंतर कुटुंबियांनी वकिलांच्या मार्फत तक्रार करत कोर्टात अर्ज सादर केला. मात्र प्रकरण अंगाशी येणार असल्याने अधिकाऱ्यांनी त्या तरुणांना पुढे कुठलाही त्रास होणार नसून काही खास सवलती देण्याचे कबूल केल्याने या प्रकरणात पुढे कारवाई झाली नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos