उद्यानात रंगला जुगाराचा डाव; रामनगर पोलिसांच्या छाप्याने सहा जणांचे रंगेहात बिंग फुटले!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील तीर्थरूप नगर परिसरातील उद्यानात झाडांच्या आडोशाला बसून ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावत जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रामनगर पोलिसांनी रंगेहात पकडले. २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सहा मोबाईल, जुगाराचे पत्ते आणि रोख रक्कम असा एकूण ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत बबन विठ्ठल पुल्लावार ६४ वर्ष, एकनाथ यादव आसुटकर (७० वर्ष), श्रीधर लक्ष्मण कलवल (४२ वर्ष), अमोल चरणदास गेडाम (३५ वर्ष), पवन माणिक लुटे २९ वर्ष आणि सुरेश यादव देवतळे (६४ वर्ष), सर्व रा. चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले. यातील काही जण सेवानिवृत्त असून, काही जण खासगी नोकरी व वाहनचालक म्हणून काम करतात.
रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना तीर्थरूप नगर येथील उद्यानात काही जण पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी झाडांच्या आडोशाला गोलाकार बसून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना घेराव घालून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींच्या अंगझडतीत सहा मोबाईल फोन, जुगाराच्या डावावरून ५२ ताशपत्ते आणि ३ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस हवालदार रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, मंगेश बेंडे, पोलीस शिपाई पंकज ठोबरे, संदीप गेडाम, सुरज शेडमाके यांनी केले.




Petrol Price




