अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी सात दिवसात कागदपत्र जमा करावी
- तहसीलदार रोशन मकवाने यांचे आवाहन
- अन्यथा निधी परत जाणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यात वारंवार सूचना देऊनही ज्या अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठी कार्यालयाकडे जमा केली नाही. वरोरा तालुक्यातील अशा २ हजार ४८५ शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत आपली कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन तहसीलदार रोशन मकवाने यांनी केले आहे. तसेच निर्धारित कालावधीत कागदपत्रे सादर न केल्यास शिल्लक राहिलेला निधी शासनाला परत पाठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वरोरा तालुक्यात जुलै ते ऑगस्ट २०२२ मध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अशा ३७ हजार ३०७ शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईपोटी ७९.२३ कोटी रुपयांचा निधी तहसील कार्यालयाला प्राप्त झाला होता.
हा निधी नैसर्गिक आपत्तीग्रस्त बाधित शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्यासाठी वरोरा तहसीलदार रोशन मकवाने यांनी व्यूहरचना आखून निधी वाटपाला मूर्त रूप दिले. यासाठी गावोगावी दवंडी देऊन आणि दौरे करून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली व कागदपत्र गोळा करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम गोळा करण्याची प्रक्रिया राबवली गेली. परंतु वारंवार माहिती व सूचना देऊनही ३७ हजार ३०७ शेतकऱ्यांपैकी २ हजार ४८५ लाभार्थी शेतकऱ्यांची आवश्यक ती कागदपत्रे अद्याप तलाठी कार्यालयापर्यंत पोहोचलीच नाही. यामुळे सदर शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहिले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत आवश्यक ते कागदपत्रे तलाठी कार्यालयाकडे जमा करावी. निर्धारित कालावधीत संबंधित शेतकऱ्यांची खाते क्रमांक, आधार कार्ड व संमतीपत्र न आल्यास त्यांच्यासाठीचा शिल्लक राहणारा निधी शासनाला परत पाठविला जाईल, असे तहसीलदार रोशन मकवाने यांनी स्पष्ट केले आहे.
News - Chandrapur