महत्वाच्या बातम्या

 उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध


- पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांचे आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयामध्ये आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशात्सव आणि विसर्जन असे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. यात नियमांचे उल्लंघन होऊ नये, तसेच सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व कायदा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी २७ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ आणि कलम ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.

प्रमुख निर्बंध व नियम : यात लेझर लाईटवर पूर्ण बंदी, मिरवणुकीदरम्यान तीव्र अति तीव्रतेचे फ्लॅश लाईट व मानवी डोळयांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलिस अधिकारी/ सक्षम प्राधिकारी हे मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करू शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील, असे आदेशा नमुद आहे.

ध्वनिवर्धक व डीजे वापराबाबतचे नियम : सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाउडस्पिकर, अ‍ॅम्प्लीफायर वापर करता येणार नाही.

मॉडीफाईड साउंड सिस्टीमवर बंदी : प्लाझ्मा सिस्टीम, मॉडीफाईड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर यासारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहील.

शांतता क्षेत्र : रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यासारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डीजे वापरण्यास सक्त मनाई राहील. (जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस / वेळ वगळून).

परिसरनिहाय ध्वनी तीव्रता मर्यादा (डेसिबल) : १) औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डीबी, रात्री ७० डीबी, २) व्यावसायीक क्षेत्रात दिवसा ६५ डीबी, रात्री ५५ डीबी, ३) निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डीबी, रात्री ४५ डीबी, ४) शांतता क्षेत्रात (सायलेंस झोन) दिवसा ५० डीबी आणि रात्री ४० इतकी डेसिबलची मर्यांदा राहील.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई : नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ७० अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा उपकरणे जप्त केली जातील.

अटक व खटला : आयोजक, ऑपरेटर किंवा वाहन चालक विरुध्द महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटक केली जाऊ शकते. तसेच कलम १३४, १३६ अन्वये न्यायालयात खटला दाखल केला जाईल.

सर्व नागरिक, उत्सव मंडळ व आयोजकांनी शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करण्याचे आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन, पोलिस प्रशासनाने केले आहे.





  Print






Related Photos