आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
साऱ्यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हयाचा विकास गतिमान झालेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील " आम आदमी  "  केंद्रस्थानी मानून विकास गंगा पुढे जाईल या दृष्टीने प्रयत्न करुन आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्हयाच्या विकासासाठी कटीबध्द होऊ या असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. 
स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका दिमाखदार सोहळयात राजे अम्ब्रीशराव यांनी ध्वजारोहण केले.  या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलिस अधिक्षक शैलेष बलकवडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपवनसंरक्षक शिवाजी फुले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
 आपल्या या आदिवासी बहूल आणि दुर्गम जिल्ह्यात सर्वांपर्यंत विकास पोहचावा यासाठी शासन सातत्याने काम करित आहे. ' सबका साथ सबका विकास ' ही प्रेरणा घेऊन ' आम आदमी '  चा विकास हे ध्येय्य आहे.  हा जिल्हा विकासाच्या बाबतीत बराच मागासलेला  आहे.  त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  ' आकांक्षित ' जिल्हा कार्यक्रमात गडचिरोलीची निवड केली आहे. असे सांगून ते म्हणाले की, कोणतेही आव्हान हे संधी म्हणून स्विकारले तर आपल्याला चांगले कार्य उभे करता येते. या भुमिकेतून या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून जिल्ह्यावर असणारा मागासलेपणाचा ठसा मिटवण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन आता कामाला लागले आहे. यातील विविध निर्देशांकांची उद्दीष्टे निश्चित करुन सन २०२२ पर्यंतच्या प्रगत गडचिरोलीचा आराखडा नजरेसमोर ठेवून काम सुरु झाले आहे.  यात शासन पूर्ण क्षमतेने आर्थिक पाठबळ देईल याची ग्वाही मी आज आपणास देतो असेही ते म्हणाले.   
 या जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती आहे.  त्यामुळे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द व्हावा यासाठी विविध कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहे.  जिल्ह्यात ७८ टक्के वनक्षेत्र असल्याने मोठे प्रकल्प उभारणे शक्य नाहीत हे लक्षात घेऊन जिल्ह्यात जलयुक्त शिवार, तसेच मागेल त्याला शेततळे आणि विहिरी बांधण्यासोबत मामा तलाव दुरुस्तीमधून सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 जिल्ह्यास १५०० (दिड हजार) शेततळयांचे उद्दीष्ट होते.  मात्र शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत ४ हजार शेततळयांची निर्मिती पुर्ण झाली आहे.  उर्वरित ४ हजार अर्जदारांनाही शेततळी द्या असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.  सोबतच ५ हजार विहिरी सिंचनासाठी बांधल्या जात आहेत.  यातील ८० टक्के काम पुर्ण झाले आहे.  याचा फायदा जिल्हयातील शेतकऱ्यांना होईल या शब्दात त्यांनी खात्री व्यक्त केली. 
 निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मधल्या काळात मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.  याची जाणीव ठेवून शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ केली.  आपल्या जिल्हयात या अंतर्गत ९४ कोटी रुपयांहून अधिकची कर्ज माफी जिल्हयात देण्यात आली.  सोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग वाढवण्याची कार्यवाही करण्यात आली.  शेतकऱ्यांसाठी आम्ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आणली.  यातून ६४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आल्याचे त्यांनी सांगितले.
 जिल्हयात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे.  चालू खरीप हंगामापासून धानाचे किमान खरेदी मुल्य वाढविण्याचा निर्णय आमच्या सरकारने लागू केला आहे.  त्याचाही लाभ जिल्हयात मोठया प्रमाणावर होणार आहे.  गेल्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळातर्फे १०८ कोटींहून अधिक रकमेचे धान शासनाने खरेदी केले.  जिल्हयात वाढते उत्पादन लक्षात घेऊन मोठया प्रमाणावर खरेदी करण्यासाठी गोदामांची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन अधिक गोदामे बांधण्यात येत आहे.  शेतकऱ्यांना जिल्हयात यांत्रिकीकरणाचाही लाभ दिला जात आहे, असे ते म्हणाले. 
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हयाच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही हे स्पष्ट केलेले आहे.  आणि त्याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांचा प्रतिसाद  विकासाला गती देण्यास मदत करेल असे सांगून ते म्हणाले की, याच माध्यमातून गेल्या ४ वर्षात जिल्हयात सर्व घरात पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व जिल्हा  निधीतून वीज पुरवठा पोहचविण्यात आम्हाला यश आले आहे. 
आदिवासी बहूल आणि वनाच्छादीत जिल्हयात जंगलतोड होवू नये व महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावणे शक्य व्हावे यासाठी उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे.  या अंतर्गत ९८ हजार गॅस कनेक्शन गेल्या साडेतीन वर्षात देण्यात आले.  याने प्रदूषणही कमी झाले आहे.  
 आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जी सुरुवात केली त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसत आहे.  या कामांच्या गतीबाबत जिल्हाधिकारी  शेखर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.  
 जिल्हयात वनक्षेत्र मोठया प्रमाणावर आहे.  या वनातून मिळणाऱ्या गौण वन उपजावर पेसा ग्रामपंचायतींचा हक्क मान्य करण्यात आला आहे.  सोबतच बांबूवरील वाहतूक निर्बंध शासनाने गेल्या वर्षी मागे घेतले त्यामुळे तेंदू पत्ता, मोह तसेच बांबू यातून ग्रामपंचायतींना आता समृध्दीचा मार्ग सापडला आहे. जांभूळ, चारोळी सारख्या वन उपजाबाबत क्लस्टर आधारे खरेदी, साठवण आणि विक्रीचे जाळे जिल्हयात येणाऱ्या काळात निर्माण करण्यात येत आहे.  या सर्वांचा फायदा जिल्हयातील उपजिविका साधनांची वाढ होण्यात आणि प्रत्येक हाताला काम मिळण्यात होणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.  
 जुलै महिन्यात आपण सर्वांनी वनमहोत्सव साजरा केला.  १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात  जिल्हयाने १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली याबद्दल या खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला विशेष आनंद आहे. असे सांगून  याबद्दल वनविभागासोबत सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे त्यांनी अभिनंदन केले.   गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्यासाठी पोलिस दल सातत्याने कार्यरत आहे.  मागील वर्षभरात या कामात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले.  चालू वर्षात पोलिस दलाने ४७ नक्षलवादी ठार केले तर पोलिसांच्या जनसंपर्कामुळे १० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.  या त्यांच्या कामगिरीमुळे जिल्हयाची प्रतिमा बदलण्यास मदत होणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, हिंसेला उत्तर अहिंसा अर्थात विध्वंसाला विकासाने उत्तर देण्याचे काम महात्मा गांधींच्या अहिंसावादी विचारांनी केले.  या गांधीवादी विचारवाचनात गडचिरोलीतील पोलिस दल आणि नागरिक यांनी गडचिरोलीचे नाव गिनीज बूक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदवून जिल्हयाची नवी ओळख निर्माण केली.  या विश्वविक्रमाबद्दल तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे विशेष अभिनंदन मी करतो. 
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना यासाठी जिल्हयाला मोठा निधी प्राप्त झाला आहे.  या खेरीज आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी ४३ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.  
 आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने जिल्हयाच्या विकासासाठी कटीबध्द होवू या आणि एक विकसित गडचिरोली निर्माण करुयात असे आवाहन मी या निमित्ताने करतो.  त्यानंतरच सबका साथ सबका विकास सत्यात उतरेल, असे ते म्हणाले.
 कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी अशोक   चौधरी यांनी केले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-15


Related Photos