महत्वाच्या बातम्या

 नागपूर महापालिका क्षेत्रात रमाई आवास योजनेच्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता २ हजार ८ प्रस्तावांना मंजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५-२६ या वर्षासाठी रमाई आवास घरकुल योजनेच्या (शहरी) उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता झाली आहे. या अंतर्गत एकूण २ हजार ८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा व त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले होते.सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले जाते. जिल्हास्तरावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत ही योजना राबवली जाते.

शासनाकडून नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता २ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी सर्व दहा प्रभागांमध्ये २३ फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक वस्तीत जाऊन माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले तसेच जनमाध्यमांचा वापर करून नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रभागनिहाय प्राप्त अर्जांमधील कागदपत्रांची पडताळणी शासन निर्णयातील अटी व शर्तींनुसार करण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी आणि प्रस्तावांना घरकुल निर्माण समितीमार्फत मंजुरी देण्यात आली. ही सर्व कार्यवाही समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. सन २०२५-२६ या वर्षात मंजूर झालेल्या एकूण २ हजार ८ प्रस्तावांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून महानगरपालिकेस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रभागनिहाय पात्र लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे - 
लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक १ मध्ये २८१, धरमपेठ प्रभाग क्रमांक २ मध्ये ३०१, हनुमान नगर प्रभाग क्रमांक ३ मध्ये २५०, धंतोली प्रभाग क्रमांक ४ मध्ये २०६, नेहरूनगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये १४६, गांधीबाग प्रभाग क्रमांक ६ मध्ये १७४, सतरंजीपुरा प्रभाग क्रमांक ७ मध्ये २४७, लकडगंज प्रभाग क्रमांक ८ मध्ये ५२, आशीनगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये २२३ आणि मंगळवारी प्रभाग क्रमांक १० मध्ये १२८ असे मिळून एकूण २ हजार ८ पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला (वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा कमाल ३ लाख रुपये), अर्जदाराच्या नावावर स्वतःची मोकळी जागा अथवा कच्चे झोपडे असणे, घराची कर पावती व जागा मालकीचे पुरावे असणे आणि अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसणे या अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर व महानगरपालिका नागपूर कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही १०० टक्के उद्दिष्टपूर्तीची कार्यवाही पूर्ण झाली.





  Print






Related Photos