चार महिन्यांचे मानधन थकीत : बल्लारशाह वनविभागातील रोजंदारी मजूर आर्थिक संकटात, आंदोलनाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वनविभागाच्या वाहतूक व विपणन, बल्लारशाह विभागांतर्गत विविध काष्ठ भांडार आणि लाकूड आगारांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी रोजंदारी मजुरांचे जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांचे मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मानधनाअभावी घरखर्च चालविणे, वीजबिल भरणे, मुलांच्या शाळेची फी भरणे आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. थकीत मानधन तातडीने मिळावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा मजुरांनी दिला आहे.
वाहतूक व विपणन, बल्लारशाह विभागांतर्गत अनेक वर्षांपासून हंगामी रोजंदारी मजूर विविध कार्यालये आणि आगारांमध्ये कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोपविण्यात आलेली कामे नियमितपणे पार पाडणाऱ्या या मजुरांना यापूर्वी विभागामार्फत वेळेवर मजुरी मिळत होती. मात्र, सन २०२५ पासून बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट चंद्रपूर येथील इंडियन सिक्युरिटी फोर्स या संस्थेला देण्यात आल्यानंतर मानधनाच्या अनियमिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. संबंधित संस्थेकडून यापूर्वीही दोन ते तीन महिने विलंबाने मानधन दिले जात असल्याची तक्रार आहे. आता जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचे मानधन थकीत असल्याने मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर काम करूनही कष्टाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक ओढाताण वाढली आहे.
मानधनाअभावी अनेक मजुरांना घरातील वीजबिल आणि पाणीकर भरता आलेला नाही. वीजबिल थकल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची बाबही मजुरांनी मांडली आहे. किराणा दुकानदारांची उधारी वाढल्याने जीवनावश्यक वस्तू मिळविणे कठीण झाले आहे. गॅस सिलिंडर संपल्यानंतर तो पुन्हा भरून घेण्यासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्याने कुटुंबांचा दैनंदिन खर्च भागविताना अडचणी येत आहेत. मुलांच्या शाळेची फी आणि शाळेत जाण्या-येण्यासाठी लागणारा वाहनखर्च थकीत आहे. कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास दवाखान्याचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे. घरखर्चासाठी नातेवाइकांकडून किंवा सावकारांकडून पैसे उसने घ्यावे लागत असून, घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यातच कर्जावरील व्याज आणि बचत गटांचे हप्ते भरणे कठीण झाल्याने मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे.
मानधनाच्या प्रश्नासोबतच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) यांच्याशी संबंधित सुविधांबाबतही मजुरांच्या तक्रारी आहेत. अनेक मजुरांची पीएफ खाती अद्ययावत करण्यात आलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ईएसआयसीसाठी रक्कम कपात होत असली, तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित संस्थेकडून ईएसआयसी कार्ड, आवश्यक प्रमाणित कागदपत्रे आणि ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. करारातील अटींनुसार कामगारांसह त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधित संस्थेची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सर्व कामगारांना आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्यविषयक सुविधांचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कंत्राटी मजुरांना साप्ताहिक सुट्टी मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. रविवारीसुद्धा काम करावे लागत असून, सुट्टीच्या दिवशी काम केल्यानंतर त्याचे योग्य मानधन मिळत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. गरज असतानाही सुट्टी मिळत नसल्याने वैयक्तिक आणि कौटुंबिक कामांसाठी अडचणी निर्माण होत आहेत. काही वेळा मानधनात कपात होत असल्याची तक्रारही मजुरांनी केली आहे. संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांचे थकीत मानधन एकरकमी आणि तातडीने अदा करावे, अशी मजुरांची प्रमुख मागणी आहे. प्रत्येक महिन्याचे मानधन पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियमितपणे देण्यात यावे, अशीही त्यांची अपेक्षा आहे. संबंधित कंत्राटदाराकडून करारातील अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचा आरोप करत त्याचे कंत्राट रद्द करावे आणि पूर्वीप्रमाणे विभागीय कार्यालयामार्फत मजुरांना मानधन देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी तयार करण्यात आलेल्या निवेदनातून मजुरांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे थकीत मानधनाचा प्रश्न मांडण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत थकीत मानधन अदा करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा मजुरांनी दिला आहे.
या मागण्यांसाठी पुढाकार घेणाऱ्या मजुरांमध्ये अरविंद करमरकर, विलास वेलादी, प्रशांत पंडित, सुनील वाढई, नवनित नगराळे, नितीन युवने, हेमंत आनदेव, प्रणल बुजाडे, गणेश साळवे, उमेश काकडे, नितेश उईके, रमेश रामटेके, संदीप मत्ते, विफुल करमरकर, तारासिंग वर्मा, संतोष सावसाकडे, राज वर्मा, शुभम ढेंगळे, गौतम डांगे, विजय कैथवास, उमेश राखुंडे, अनिमा मजुमदार, संगीता कांबळे, सुहासिनी गावडे, सुनीता साठे आणि संगीता रिंगणे यांचा समावेश आहे.




Petrol Price




