महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात धारदार गुप्तीसह तरुण ताब्यात : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शस्त्र कायद्यान्वये गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड परिसरातील नागमंदिराजवळ धारदार लोखंडी गुप्ती बाळगून फिरणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच त्याने हातातील शस्त्र बाजूला फेकून दिले. मात्र, पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता कचऱ्यातील सिमेंटच्या पाइपमध्ये लपवून ठेवलेली गुप्ती जप्त करण्यात आली. या प्रकरणी शाहरुख उर्फ धुव्वा मुन्ना शेख याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत खासगी वाहनाने गस्त घालत होते. यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डातील नागमंदिराजवळ एक तरुण धारदार शस्त्र बाळगून फिरत असून, त्याच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

माहितीची खातरजमा करून पोलीस पथक नागमंदिराजवळ पोहोचले असता, माहितीतील वर्णनाशी जुळणारा तरुण तेथे उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच त्याने हातातील वस्तू बाजूला फेकून दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन धारदार शस्त्राबाबत चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने कचऱ्यात सिमेंटच्या पाइपमध्ये फेकलेले शस्त्र काढून दिले. ही लोखंडी गुप्ती असून, तिला प्लास्टिकची मूठ आहे. तिची एकूण लांबी अंदाजे ५३ सेंटीमीटर आहे.

सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी पंचनामा करून संबंधित शस्त्र जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बल्लारपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा पुरुषोत्तम चिकाटे, संतोष पंडीत, मिलिंद आत्राम, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे, महेश कुकुडकर यांनी केले.

 नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असताना ही घटना उघडकीस आली.





  Print






Related Photos