महत्वाच्या बातम्या

 जिल्हा सामान्य रुग्णालयात आशा स्वयंसेविकांसाठी आशा घर


- उशीर झाल्यास आशा स्वयंसेविकेला करता येणार मुक्काम

- जिल्ह्यात १ हजार १३३ आशा स्वयंसेविका मंजूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आशा स्वयंसेविकेला बरेचदा ग्रामीण भागातील रुग्णांसोबत जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते. सोबत असलेल्या महिलेची प्रसुती किंवा गंभीर आजाराच्या रुग्णांचे निदान होईपर्यंत तिला रुग्णालयातच थांबावे लागते. अशावेळी आशा स्वयंसेविकेला गैरसोय होऊ नये, तसेच तिला मुक्कामाचे हक्काचे व सुरक्षित साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आशा घर तयार करण्यात आले आहे.  

या आशा घरचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.जे. पराडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण वेदपाठक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा माता व बाळ संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये १ हजार ३३ व शहरी भागामध्ये १०० आशा स्वयंसेविका मंजूर आहे. आशा स्वयंसेविकेला निश्चित करून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतांना जननी सुरक्षा योजनेच्या महिला लाभार्थी व इतर गंभीर स्वरूपाच्या लाभार्थ्यांना शासकीय संस्थेत घेऊन जावे लागते. जोपर्यंत महिलेची प्रसूती होत नाही किंवा रुग्णाच्या आजाराचे निदान होत नाही, तोपर्यंत आशा स्वयंसेविकेला आरोग्य संस्थेत उपस्थित राहावे लागते. अशावेळी उशीर झाल्यास रात्रीच्या वेळी वाहन उपलब्ध होत नाही किंवा सुरक्षेच्यादृष्टीने उशिरा गावी जाणे योग्य नसते. त्यामुळे आशा स्वयंसेविकेला आरोग्य संस्थेत थांबावे लागते. शासकीय रुग्णालयात विश्राम करण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था नसल्याने आशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. 

आशा स्वयंसेविकेला उशीर झाल्यास जिल्हा रुग्णालयात सुरक्षित आणि हक्काचे मुक्कामाचे ठिकाण उपलब्ध व्हावे, यासाठी आशा पीआयपी अंतर्गत आशा घर करिता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रसुती कक्षाच्या बाजूला एक स्वतंत्र कक्षाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. उद्घाटनावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॅा. पराडकर यांनी प्रसुतीच्या रुग्णांसोबत सामान्य रुग्णालयात आलेल्या आशा स्वयंसेविकांनी रात्रीच्यावेळी थांबण्याकरिता आशा घरचा वापर करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनास राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अन्नपूर्णा ढोबळे, जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी स्मिता वासनिक, जिल्हा आशा समन्वयक दिपाली चांडोळे, लेखापाल शमा खान, प्रवीण गावंडे, तालुका समूह संघटक तारा राजगुरे, मातृवंदना योजनेच्या समन्वयक निता दांडेकर, जिल्हा आशा गटप्रवर्तक दिपाली तारणेकर व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos