बंद घराचे कुलूप तोडून ५२ हजारांचा ऐवज लंपास : सैनिक स्कूल परिसरात घरफोडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दोन दिवसांसाठी आईसोबत बाहेरगावी गेलेल्या महिलेचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सैनिक स्कूल परिसरात उघडकीस आली. गौरी विनोद वानखडे (२७), रा. सैनिक स्कूल, भिवकुंड, विसापूर, ता. बल्लारपूर, असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्या आईसोबत खासगी कामानिमित्त मूळगावी मलकापूर (जि. बुलढाणा) येथे गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या असताना २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४० वाजता घरी परतल्या. यावेळी घराच्या दरवाजाची लोखंडी कुंडी कापलेली आणि दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडे होते आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे जुने मंगळसूत्र (किंमत ३५ हजार रुपये), २० ग्रॅम वजनाचा चांदीचा कडा (८ हजार रुपये), २० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण (२ हजार रुपये) आणि सात हजार रुपये रोख असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची लोखंडी कुंडी कापून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील दोन लोखंडी कपाटांचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी गौरी वानखडे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




