नाट्यकलेतून सामाजिक प्रबोधनासह संस्कृती आणि संस्कारांचे जतन होते : तनुश्रीताई आत्राम

- कष्टाची भाकर नाट्यप्रयोगाचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नाट्यकला ही समाजातील वास्तव, कौटुंबिक मूल्ये आणि मानवी नातेसंबंध प्रभावीपणे मांडणारे सशक्त माध्यम असून, नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनासोबतच संस्कृती आणि संस्कारांचे जतन होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रामनगर, गडचिरोली येथे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, शाखा रामनगर यांच्या सौजन्याने बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता कष्टाची भाकर या सामाजिक व कौटुंबिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंटीभाऊ खडसे होते.
यावेळी पुढे बोलताना तनुश्रीताई आत्राम म्हणाल्या की, नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील विविध प्रश्न आणि परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. नाट्यकलेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक विचार देण्यासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांची जाणीव करून देता येते. आजच्या आधुनिक काळात आपल्या सांस्कृतिक परंपरा जपणे आणि त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि संस्कारांची ओळख होते. त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन देतानाच अशा उपक्रमांना समाजानेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या विचारांतून समाजाला एकता, बंधुता, सेवाभाव आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित हा नाट्यप्रयोग त्यांच्या विचारांना उजाळा देणारा असून, अशा कार्यक्रमांतून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे घडते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्षाताई शेडमाके, ऋषिकांत पापडकर, श्रीकांत देशमुख, संजू मांडवगडे, रमेश भुरसे, हर्षल गेडाम, अविनाश वरगंटीवार, प्रदीप महाजन, अनिल कोठारे, मोरेश्वर हजारे आणि हरीश सिडाम यांची उपस्थिती होती.या नाट्यप्रयोगाला रामनगर परिसरातील नाट्यप्रेमी, नागरिक आणि रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




Petrol Price




